अग्निजन्य खडकांचे वैशिष्ट्ये – Characteristics of igneous rocks

 अग्निजन्य खडकांचे वैशिष्ट्ये सांगा (Characteristics of igneous rocks)

अग्निजन्य खडक अस का म्हणतात

पृथ्वीतील तप्त, वितळलेला द्रव थिजून तयार झालेल्या खडकांस ‘अग्निज खडक’ म्हणतात. ज्याच्यापासून अग्निज खडक तयार होतात त्या तप्त द्रवाला ⇨शिलारस  म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठाखाली, खोल किंवा उथळ अशा ठिकाणी शिलारस तयार होतात. शिलारस असलेल्या स्थानापासून निघून कवचाच्या अधिक उथळ भागात जाणाऱ्या भेगा-पोकळ्या नैसर्गिक घडामोडींमुळे उत्प‍न्न झाल्या म्हणजे त्याच्या वाटे खोल व अधिक दाब असलेल्या जागेतील शिलारस अधिक उथळ व कमी दाब असलेल्या जागी येतात. ते पृष्ठाशी येऊ शकले म्हणजे ⇨ज्वालामुखी निर्माण होतात. जागृत ज्वालामुखींतून बाहेर पडणाऱ्या शिलारसाला ‘लाव्हा’ म्हणतात. लाव्हे हे शिलारसाचे आपणास प्रत्यक्ष पाहवयास मिळणारे नमुने होत. लाव्हा थिजून तयार होणाऱ्या खडकास ज्वालामुखी खडक, उद्गीर्ण खडक किंवा लाव्हे असेही म्हणतात.

अग्निज खडकांचे प्रकार : प्राण्यांत किंवा वनस्पतींत जशा जाती असतात तशा खडकांत नसतात. सर्वस्वी स्फटिकमय व सर्वस्वी काचमय किंवा ८०% पेक्षा अधिक सिलिका व ४०%पेक्षा कमी सिलिका किंवा ६०% पेक्षा अधिक क्वॉर्ट्‌झ  किंवा दुसरे एखादे खनिज असलेल्या व क्वॉर्ट्‌झ किंवा ते दुसरे खनिज मुळीच नसलेल्या व त्या दोहोंच्या मधले कोणतेही प्रमाण असलेल्या खडकांच्या वेगवेगळ्या राशी निसर्गात आढळतात. शिवाय कधी कधी एकाच राशीत वर उल्लेख केल्यासारखे भिन्न भिन्न लक्षणे असलेले खडक आढळतात. उदा., ग्रॅनोडायोराइटातील क्वॉर्ट्‌झाचे प्रमाण हळूहळू कमी होत जाऊन तयार झालेले क्वॉर्ट्‌झ डायोराइट व डायोराइट यांसारखे खडक कित्येक बॅथोलिथांत आढळतात 

रासायनिक संयुगांना किंवा प्राण्या-वनस्पतींना नावे देण्याच्या नामकरण पद्धतीसारख्या पद्धती खडकांच्या बाबतीत वापरता येत नाहीत. खडकांची सायेनाइट व बेसाल्ट यांसारखी काही नावे प्राचीन कालापासून चालत आलेली आहेत. काही खडकांची नावे ते प्रथम आढळले त्या स्थानांवरून किंवा देशांवरून व काहींची त्यांच्या गुणधर्मांवरून, संरचनेवरून किंवा मुख्य खनिजावरून दिली गेली आहेत. सामान्य व्यवहारातील नावे काळजीपूर्वक वापरली जातात असे नाही व खडकांच्या निरनिराळ्या जातींना एकच नाव दिलेलेही पुष्कळदा आढळते. खडकांच्या नावांच्या बाबतीतील गोंधळ काढून टाकण्याचे प्रयत्न झालेले आहेत पण ते यशस्वी झालेले नाहीत.

बारीकसारीक व कित्येकदा अगदी उपेक्षणीय असे भेद लक्षात घेऊन ठरविलेल्या अग्निज खडकांच्या जातींची व त्यांच्या नावांची संख्या सातशेपेक्षा अधिक भरते. पण इतक्या जाती मानण्याची आवश्यकता नाही. सुमारे साठ जाती मानून काम भागेल. त्या साठांपैकीही बहुसंख्य जाती विरळाच आढळणाऱ्‍या आहेत व त्यांच्यपैकी अधिक महत्त्वाच्या अशा जातींची नावे खालील तक्त्यात दिलेली आहेत.

तक्त्यातील वर्गीकरणात वयनावर आधारलेले भरडकणी, मध्यमकणी व सूक्ष्मकणी असे तीन प्रमुख विभाग आहेत. भरडकणी विभागात मुख्यत: मोठ्या अंतर्वेशनांच्या खडकांचा, मध्यमकणी विभागात मुख्यत:  गौण  म्हणजे लहान अंतर्वेशनांच्या खडकांचा व सूक्ष्मकणी विभागात मुख्यत: ज्वालामुखी खडकांचा समावेश होतो. अंतर्वेशी राशींच्या वेगाने किंवा एकाएकी निवलेल्या गेलेल्या भागांपासून थोडी किंवा पुष्कळ काच किंवा गूढ, भ्रूण किंवा सूक्ष्म स्फटिक असलेले खडक तयार होतात व त्यांचा समावेशही सूक्ष्मकणी विभागात केला जातो.

अंतर्वेशी अग्निज खडकांचे, पातालिक म्हणजे खोल जागी तयार झालेले व उपपातालिक म्हणजे कवचाच्या उथळ भागात तयार झालेले, असे विभाग पूर्वी केले जात. पातालिक खडक पूर्णस्फटिकी व सापेक्षत: भरडकणी असतात व त्यांच्या राशी मोठ्या असतात. उपपातालिक राशी लहान असतात. त्यांचे खडक सापेक्षत: बारीक कणी असतात व त्यांच्यात कधीकधी काच किंवा गूढ, भ्रूण किंवा सूक्ष्म स्फटिक असतात. अग्निज खडकांचे अधिक अध्ययन झाल्यावर असे दिसून आले की, शिलारसांचे स्फटिकीभवन हे केवळ त्याच्या खोलीवर अवलंबून नसते व उथळ जागेतही पातालिक खडकांसारखे पूर्णस्फटिकी व भरडकणी खडक तयार होणे शक्य असते. म्हणून ‘उपपातालिक’ ही संज्ञा आता वापरली जात नाही. तिच्याऐवजी गौण ही संज्ञा कधीकधी वापरली जाते.

marathi vishv kosh 

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy