अहमदनगर : पाच लाखाचे 12 लाख देऊनही खाजगी सावकाराने चारचाकी गाडी पळवली ,कर्जत तालुक्यातील घटना

Ahmednagar: Private lender hijacks four-wheeler despite paying Rs 12 lakh)
काल्पनिक फोटो 

कर्जत : विटभट्टी व्यवसायासाठी खाजगी सावकाराकडून घेतलेल्या पाच लाख रुपयांच्या मुद्दलेवर तब्बल सव्वा सात लाख रुपये व्याज दिले… तरीही सोकावलेल्या सावकाराची भुक भागली नाही…सावकाराने बळजबरीने स्कॉर्पिओही ओढून नेली (The moneylender forcibly dragged Scorpio away)…मुद्दलीसह १२ लाख २० हजार देऊनही अजुन व्याजाचे व्याज १० लाख रुपये बाकी आहेत असे म्हणणाऱ्या दोन सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

         याबाबत सविस्तर माहिती अशी,आजीम नशिर शेख (रा.दुरगाव ता.कर्जत) यांचा विटभट्टीचा व्यवसाय असुन त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच व्यवसायातुन चालतो. दि.३ एप्रिल २०१५ रोजी विटभट्टी व्यवसायासाठी दुरगाव येथील खाजगी सावकार दत्तू दगडू भगत याच्याकडुन ५ लाख रुपये ६ रु. टक्के व्याजदराने घेतले होते.त्यानंतर पुढील वर्षी व्याजापोटी दि.३ एप्रिल २०१६ रोजी १ लाख ५० हजार रु. शेख यांनी सावकाराला दिले.त्यानंतर पुढील वर्षी दि.३ एप्रिल २०१७ रोजी ५ लाख मुद्दल व १ लाख व्याज असे एकूण ६ लाख रुपये सावकाराच्या बँक खात्यावर आर.टी.जी.एस केले.एवढी रक्कम देऊनही ‘तुमच्याकडे अजुन ४ लाख ७० हजार रुपये व्याज शिल्लक राहिले आहे’ असे सावकाराने सांगितले.ही रक्कम आत्ता लगेच दिली नाही तर या एकमेवर ६ टक्के दराने व्याज आकारले जाईल असेही सांगितले.त्यानंतर २ वर्षांनी तक्रारदार शेख यांनी दि.३ एप्रिल २०१९ रोजी सावकाराला ४ लाख ७० हजार रुपये दिले.एवढी मोठी रक्कम देऊनही सावकाराची भुक भागली नाही.’तुमच्या व्याजाचे व्याज ५ लाख ४५ हजार २०० रु.शिल्लक राहिले असून तुम्हाला आमचे पुर्ण पैसे देता येत नाहीत व तुम्ही आमचे व्याजाचे पैसे परत करू शकत नाही.

तुमच्याकडे किती वेळा हेलपाटे मारायचे? तुमची एम.एच १४ जी एच २२०६ ही स्कॉर्पिओ गाडी आम्ही घेऊन जात आहे.जोपर्यंत तुम्ही व्याजाचे संपुर्ण पैसे देत नाही तोपर्यंत ही गाडी आमच्याकडेच राहील’ असे म्हणत सप्टेंबर २०२० रोजी ही गाडी दत्तू दगडू भगत व राजु गुलाब शेख यांनी बळजबरीने ओढून नेली.’मी आज ना उद्या तुमचे पैसे देईन पण माझी गाडी ओढून नेऊ नका’ अशी तक्रारदाराने दोघांनाही विनंती केली होती.त्यानंतर वेळोवेळी तक्रारदाराने आपली गाडी माघारी मागितली पण ‘आता ५ लाख ४५ हजार २०० रुपयांचे १० लाख रुपये झाले आहेत,तुम्ही आता १० लाख द्या मग काय ते पाहू’ असेच सांगण्यात आले. विशेष म्हणजे सावकार दत्तू भगत याने ही गाडी अजुनही तक्रारदार शेख यांना दिलेली नाही. त्यामुळे व्याजापोटी बळजबरीने गाडी ओढून नेल्याबद्दल खाजगी सावकार दत्तू दगडू भगत व राजू गुलाब शेख (दोघेही रा. दुरगाव) यांच्यावर तक्रारदार शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे,  पोलीस अंमलदार तुळशीदास सातपुते, महादेव गाडे, अवधूत माळशिखरे, मनोज लातूरकर  यांनी केली आहे.

व्याजाला व्याज अन् त्याही व्याजाला व्याज!

        काही खाजगी सावकार व्याजाने दिलेल्या रकमेवर अव्वाच्या सव्वा रक्कम वसुल करत आहेत. समोरच्या व्यक्तीच्या परिस्थितीचा फायदा घेऊन व्याजाच्या रकमेवर व्याज आकारत आहेत जर संबंधित रक्कम वेळेत नाही दिली तर त्याही व्याजाच्या रकमेला भरमसाठ व्याज आकारत आहेत.दमदाटी, शिवीगाळ प्रसंगी मारहाण असे प्रकार करत आहेत. आर्थिक, मानसिक ,शारीरिक त्रास देणाऱ्या सावकारांची आता गय केली जाणार नाही.

               -चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक कर्जत

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy