कर्मवीर भाऊराव पाटील माहिती । प्रा. डॉ.प्रदीप जगताप

    

कर्मवीर भाऊराव पाटील


                शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, हे तत्व उराशी बाळगून शिक्षणाची गंगा सर्वसामान्य, गोरगरीब, बहुजनांच्या झोपडीपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. आज ९ मे त्यांचा स्मृतिदिन,त्यानिमित्त त्यांच्या विचारांना व कार्यास विनम्र अभिवादन !!!

             मानवी जीवन चांगल्यात चांगले जगायचे असेल तर अन्ना प्रमाणेच शिक्षण देखील महत्त्वाचे आहे. स्वतःची सर्वप्रकारे प्रगती, विकास करावयाचा असेल तर ज्ञान व परिस्थितीचे भान असायला हवे. हे ज्ञान व भान देण्याचे काम शिक्षण करते. अशा या महत्त्वपूर्ण शिक्षणाचा प्रसार सर्वसामान्य जनतेत व्हावा यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना 1919 मध्ये केली. अलीकडेच रयत शिक्षण संस्थेला समूह विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला.या शैक्षणिक दैदिप्यमान वाटचालीसाठी कर्मवीरांच्या शैक्षणिक विचारांची शिदोरी कारणीभूत आहे. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या शैक्षणिक विचारांचे स्मरण करण्याचा हा छोटासा प्रयत्न.

                कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षणाबाबतचे विचार म्हणजे शिक्षणाकडे पाहण्याची त्यांची एक जीवनदृष्टी आहे. आपल्या कार्यातून, कृती व आचरणातून सर्वसामान्यांना समजेल, पेलवेल अशी व्यवहारी, आचरणात आणण्याजोगी एक असामान्य शिक्षण पद्धती आहे. शैक्षणिक तत्वज्ञानातील तात्विक पद्धतीतील मूलभूत सिद्धांत न मानता कर्मवीरांनी शिक्षणात उपयोजित पद्धतीवर आधारित कृतीवर भर दिला. कर्मवीरांनी आपल्या शिक्षण प्रसाराच्या कार्यात सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत कृतीवर जास्त भर दिला आहे. सर्वसामान्य बुद्धिमत्ता असूनही समाजाचे व सामाजिक परिस्थितीचे अचूक भान असल्याने मानवी जीवनात परिवर्तन करण्यासाठी शिक्षण कसे उपयोगात आणायचे, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. बुद्धिवान असणे आणि सुसंस्कृत असणे यामध्ये फरक असतो. चार भिंतीच्या शाळेतून किंवा औपचारिक शिक्षणातून सुसंस्कृतपणा निर्माण होईलच असे नाही. तसेच होणारच नाही असेही नाही. कर्मवीरांनी मात्र आपल्या शिक्षणातून सामान्य व्यवहारवादाची जोड देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणातून सुसंस्कृत करण्याचा प्रयत्न केला.

         शिक्षण हे लोकांच्या तत्कालीन सामाजिक पार्श्वभूमीशी निगडित असावे लागते.आपल्या शैक्षणिक विचारात कर्मवीरांनी आध्यात्मिक आत्मा, मोक्ष, आत्म्याचे परमात्म्याशी मिलन अशा गोष्टीकडे कधीही लक्ष दिले नाही. उलट सर्वसामान्य लोकांच्या भौतिक – ऐहिक  गरजा ओळखून सामाजिक,आर्थिक अशा जोखडातून त्यांना मुक्त करण्याकडे लक्ष दिले. विशेषता मुलांच्या चारित्र्य संवर्धनाकडे व सर्वांगीण उन्नतीकडे अधिक लक्ष दिले. शिक्षण हे परकीयांच्या गुलामगिरीतून व स्वकीयांच्या सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचे प्रभावी साधन आहे, हे स्पष्ट करण्याबरोबरच सामाजिक समता, न्याय व संधीची समानता या तत्वांची आपल्या शैक्षणिक विचारात सांगड घातली.

         कर्मवीरांच्या शैक्षणिक विचारात वसतिगृहयुक्त शिक्षण महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आश्रमीय पद्धत त्यांनी वसतिगृहाच्या स्तरावर राबविली. वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी उपजीविकेसाठी शेती करणे, जनावरांची निगा राखणे, सरपण फोडणे,शेतीसाठी व पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करणे, स्वयंपाक करणे व इतर अनुषंगिक आश्रमीय कामे केली पाहिजेत, याकडे कर्मवीरांचा कल होता. दुधगावच्या पहिल्या वसतीगृहास कर्मवीरांनी ‘विद्यार्थी आश्रम’ असेच नाव दिले होते. या वसतिगृहातील दिनचर्येमुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योगप्रियता, आत्मनिर्भरता, साधी राहणी व उच्च विचारसरणी, समाजसेवा, दुसऱ्यांच्या दुःखांची कदर करणे, दुसऱ्यांच्या श्रमाचा गैरफायदा न उचलणे,श्रमाचे महत्त्व जपणे अशा महत्त्वपूर्ण संस्कारांची पेरणी आपोआपच होत होती. ‘कमवा व शिका’ ही योजना विद्यार्थ्यांच्या ऐहिक उन्नती व मोफत शिक्षणाचा पाया होती व आहे.

           वसतिगृहाच्या माध्यमातून कर्मवीरांनी आपल्या कार्याची धुरा वाहणारे स्वाभिमानी,आत्मनिर्भर आपल्यासारख्याच तरुणांच्या पिढ्या तयार केल्या. ‘रयत सेवक’ तयार करणारे ते शिल्पकार ठरले. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक श्रमाचे महत्त्व रुजविले. ‘लाथ मारीन तिथे पाणी काढीन’ हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा त्याचबरोबर हलक्या प्रतीची,श्रमाची कामे करणाऱ्या व्यक्तीबद्दल तिरस्कार निर्माण होऊ नये,हा त्या पाठीमागे कर्मवीरांचा हेतू होता. त्यासाठीच वसतीगृहात झाडलोट करणे, शौचालय साफ करणे ही कामे विद्यार्थ्यांना सक्तीची होती. तसेच ही कामे करण्याने विद्यार्थ्यांमध्ये उपजीविकेसाठी कोणतेही काम करणे कमीपणाचे नाही, याची जाणीव व आत्मविश्वास निर्माण व्हावा, ही अपेक्षा होती. शिक्षणानंतर गरीब आई -वडिलांविषयी, पालकांविषयी लाज वाटता कामा नये. तो उलट त्यांच्या मदतीसाठी कंबर कसून तयार झालेला पाहिजे तसेच नोकरी करीत असताना स्वत्व, स्वाभिमान यांची लाचारीशी तडजोड करता कामा नये. मात्र दिलेले काम अनेक अडचणी आल्या तरी करण्याची विद्यार्थ्यांची मानसिकता तयार होईल, याकडे कर्मवीरांनी लक्ष दिले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी भिक्षा मागणे त्यांना मान्य नव्हते. ‘कमवा व शिका’ या मागे स्वाभिमान जागृत ठेवून सर्वांगपरीपूर्ण लोकोपयोगी नागरिक बनविणे,ही कर्मवीरांची दृष्टी होती. ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’, हे ध्येय ठरवून शासनाकडे,शेतकऱ्यांकडे ‘आम्हास पडीक जमीन द्या आम्ही तिचे सुपिक जमिनीत रुपांतर करू’, असे ते जाहीरपणे म्हणत. ही मागणी करताना विद्यार्थ्यांना शिक्षणाभिमुख करून शेतीच्या आधुनिक तंत्राबाबत, शेती कसण्याबाबत तयार करत होते. ‘श्रम प्रतिष्ठा’ हे कर्मवीरांच्या शैक्षणिक विचारातील महत्त्वाचे मूल्य आहे.

           कर्मवीरांच्या शैक्षणिक विचारांचा अंतिम हेतू पिळवणूकरहित समतेच्या तत्त्वावर आधारित एकसंघ समाजाची निर्मिती करणे हा होता. जात-पात, स्पृश्य-अस्पृश्य असा भेदभाव न करता सर्वांना शिक्षणाची व प्रगतीची संधी मिळाली पाहिजे, असे त्यांचे मत होते. समतेचे तत्त्व प्रत्यक्षात आणण्यासाठी कर्मवीरांनी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना जात-पात, जातीबहिष्कृतता, स्पृश्याकडून होणारी पिळवणूक व जुलूम यापासून निर्भय बनण्यास शिकविले. भित्रा मनुष्य बंडखोर बनू शकत नाही, असा त्यांचा विचार होता. सांप्रदायिकता, जातपात, विवेकशून्य रूढी यांच्या भयापासून मुलांना मुक्त करून त्यांना निर्भय माणूस बनवण्याचा प्रयत्न कर्मवीरांनी केला.

                कर्मवीरांनी आपल्या शिक्षणात व्यवहारवादाला महत्त्वाचे स्थान दिले. कर्मवीरांना शिक्षणाचे कार्य करीत असताना ज्या ज्या अडचणी आल्या व आव्हाने उभी राहिली त्यांना सामोरे जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला.परिस्थितीची अचूक जाण असल्याने तिला कसे सामोरे जायचे याचे भान व कौशल्य त्यांच्याकडे होते. शैक्षणिक क्षेत्रातील अज्ञानाचे जंगल प्रायोगिक पद्धतीने साफ करण्याचे काम कर्मवीरांनी केले. शिक्षणावरचा खर्च म्हणजे संधीची किंमत होय. कर्मवीरांनी हितचिंतकांच्या देणग्या व उभय पती-पत्नीच्या आर्थिक त्यागावर आपले शैक्षणिक कार्य उभारले. त्यांच्या निस्वार्थी व संन्यस्तवृत्ती मुळे त्यांच्या सानिध्यात आलेला श्रीमंत असो किंवा गरीब असो त्यांच्या त्यागी वृत्तीने भारावून जाऊन लहान मोठे आर्थिक सहाय्य करीत असे. गरीब व हुशार मुलांच्या शिक्षणात गुंतविलेले हे जनतेचे भांडवल आहे, असे कर्मवीर त्यासंदर्भात म्हणत असत.

              थोडक्यात, विद्यार्थ्यांना व्यवहारवादाचे शिक्षण देऊन त्यांना सुसंस्कृत करण्याचे काम कर्मवीरांनी केले. सामाजिक परिवर्तन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी चारित्र्यसंपन्न व आत्मनिर्भर व्हावे, श्रमाची प्रतिष्ठा जपावी, समतेचे तत्व पाळावे, येणाऱ्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड द्यावे, ही महत्वपूर्ण तत्त्वे कर्मवीरांच्या शैक्षणिक विचारात आहेत. हे कर्मवीरांचे शिक्षणा बाबतचे विचार विद्यार्थी, शिक्षक यांच्या बरोबरच प्रत्येक व्यक्तीला संस्कारांची आयुष्यभर नव्हे तर पिढ्यानपिढ्या पुरणारी शिदोरी आहेत. कर्मवीरांच्या या शैक्षणिक विचारांना व कार्याला त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

        प्रा. डॉ.प्रदीप जगताप

           

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy