गेल्या उन्हाळ्यापासून कुकडी आवर्तनाचा गोंधळ सुरू
कुकडीच्या आवर्तनापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचे पाप सरकार आणि आमदार रोहित पवार करीत आहेत.असा आरोप माजीमंत्री प्रा.राम शिंदे यांनी कर्जत येथे पत्रकारांशी बोलताना केला. दि. १० रोजी कर्जत येथे कोरोना काळातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी माजीमंत्री प्रा.राम शिंदे हे कर्जत येथे आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, कोरोनाचा भयंकर काळ सुरू असताना या काळात चुकूनही राजकारण करायचे नाही. कोरोना महामारीचा काळ आणि त्यात अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी जळून जात असताना हक्काचे कुकडीचे आवर्तन शेतकऱ्यांना मिळत नसेल तर असे राजकारण सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी करीत आहेत.
गेल्या उन्हाळ्यापासून कुकडी आवर्तनाचा गोंधळ सुरू आहे.गेल्यावर्षी पाऊस होऊन जलसंधारणाच्या कामामुळे थोडा दिलासा मिळाला पण आजच्या परिस्थितीला अनेक ठिकाणी पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या पिकांची अवस्था बिकट आहे.रब्बी हंगामातील सहा टीएमसी पाणी शिल्लक असताना सुद्धा मे महिन्यात देखील उन्हाळी आवर्तन सुटत नाही. म्हणजे पाण्यावाचून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा हा प्रकार आहे. पाणी असतांना पाणी न मिळणे हे पाप आहे.कोर्टात स्टे आहे हे कुकडीच्या इतिहासातील पहिली घटना आहे. आपल्या काळात कुकडीचे पाणी वेळेत आणि कुठलेही राजकारण न करता येत होते.