चार मंत्री व सात आमदार यांच्याकडे पाठपुरावा करून एक इंजेक्शन मिळाले नाही… पत्रकार विनायक चव्हाण यांच्या पत्नी वैशाली चव्हाण यांचे कोरोनाने निधन….
कर्जत (प्रतिनिधी) मिरजगाव येथील वैशाली चव्हाण यांना डॉक्टरांनी मागवलेले एक इंजेक्शन मिळाले नाही. या इंजेक्शन साठी चार मंत्री व सात आमदार यांच्याकडे पाठपुरावा केला होता पण इंजेक्शन मिळाले नाही यामुळे वैशाली चव्हाण यांचे निधन झाले. याबद्दल कर्जत तालुक्यातील पत्रकार बांधवांनी खेद व्यक्त केला. ##कर्जत तालुका प्रेस क्लबचे सदस्य व मिरजगाव येथील लोकमतचे वार्ताहर विनायक चव्हाण यांच्या पत्नी वैशाली चव्हाण यांचे अहमदनगर येथे खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना कोरोनाने निधन झाले. या घटनेवर चर्चा करण्यासाठी कर्जत तालुका पत्रकार संघ व कर्जत तालुका प्रेस क्लब यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत पत्रकार बांधव, वितरक व त्यांचे कुटुंबीय यांच्या विविध समस्यांवर चर्चा झाली. वैशाली चव्हाण यांच्यावर उपचार सुरू असताना उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी कोरोना बाबत आवश्यक असलेले एक इंजेक्शन उपलब्ध करण्यास सांगितले होते. हे उपलब्ध करण्यासाठी विनायक चव्हाण यांच्या प्रिंट मिडिया व इलेक्ट्रॉनिक मिडीयातील मित्र परिवाराने चार मंत्री व कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या सह सात आमदारांकडे एका इंजेक्शन साठी पाठपुरावा केला होता. पण कोणाकडूनही इंजेक्शन उपलब्ध झाले नाही. वैशाली चव्हाण यांचेवर उपचार सुरू असताना इंजेक्शन मिळाले नाही यामुळे वैशाली चव्हाण यांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्दैवी घटनेबद्दल कर्जत तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या बैठकीत खंत व्यक्त करण्यात आली. कोरोनाच्या संकटात पत्रकार बांधव व वृत्तपत्र विक्रेते यांनी दक्षता घेऊन काम करावे असे आवाहन करण्यात आले. पत्रकार बांधवांना राजकीय नेते असे दुर्लक्ष करत आहेत तर इतरांची काय स्थिती असेल कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार राज्यभर औषधे वाटप करत आहेत मात्र कर्जत जामखेड मतदारसंघातील पत्रकार बांधवांना खरी मदतीची गरज असताना मदत करत नाहीत याबाबत बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. या बैठकीत सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.