निवडणुका यशस्वी पार पाडण्यासाठी कर्जतच्या प्रशासनाची कामगिरी वाखाणण्याजोगी! karjat news live

Karjat News

कर्जत:

      कर्जत तालुक्यातील तब्बल ५६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आणि कर्जतच्या पोलीस,महसुल प्रशासनाची जबाबदारी वाढली.पार पडणाऱ्या निवडणुकीत कसल्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये.यासाठी प्रशासनाने आपली कंबर कसली आणि त्या अनुषंगाने तयारी सुरू झाली. निवडणुका उत्तमरीत्या पार पाडायच्या हा एकच उद्देश समोर ठेऊन कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,गटविकास अधिकारी अमोल जाधव तसेच संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध आखणी केली.पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी कर्मचारी,पोलीस जवान व पोलीस पाटलांनी नियोजनबद्ध काम केले.दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेल्यांवर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाया केल्या.आणि विशेष म्हणजे निवडणुकीच्या काळातील सर्वात मोठी प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यांना पोलीस ठाण्यात हजर करत चांगल्या वर्तणुकीचे बॉण्ड लिहून घेण्यात आले.कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कर्जत उपविभागात निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून कलम १०७,११६ सीआरपीसी अशा ९४ कारवाया, ११० इ.ग. २८ कारवाया, ९३ मु. दा.का. ६ कारवाया,१४४ प्रमाणे अशा ६ कारवाया या सर्व प्रतिबंधात्मक कारवाया करून,त्याच्या नोटिसा प्राप्त करून त्या संबंधितांना बजावण्यात आल्या.५ जणांच्या १४४ च्या तडीपार ऑर्डरही झाल्या.१००३ पैकी ९४५ उमेदवारांना १४९ च्या नोटीस बजावण्यात आल्या.दारूबंदीच्या ४५ आणि इतर ९ गुन्हे दाखल करत १ लाख १३ हजार व १ लाख १४ हजार रु. माल जप्त करण्यात आला.अवैध दारूविक्री करणाऱ्यांना पोलीस ठाण्यात व पोलीस चौकीत आणुन बसवण्यात आले.पोलीस प्रशासनाने सुमारे ४८ गावात निवडणुकीसंदर्भात बैठका घेतल्या.यात पोलीस अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक देऊन नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली. तहसीलदार यांच्याकडुन ५ तर इतर १० असे १५ व्हिडीओ शुटिंग कॅमेरे पेट्रोलिंग मोबाईलमध्ये आणि संवेदनशील ठिकाणी देण्यात आले.१०० मिटर फक्की आखून घेण्यात आली होती.दि.१५ रोजी पार पडल्यानंतर दि.१८ रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडली मात्र अधिकची काळजी घेत पोलीस यंत्रणेकडून नागरिकांना सुचना करण्यात आल्या होत्या त्यामध्ये मिरवणुकीला परवानगी नसल्याने मिरवणुकीला आळा घालण्यात आला होता.फटाके व वाद्य,तसेच पुंगळी काढलेल्या दुचाक्यांना प्रतिबंध करण्यात आला होता.गुलाल व त्यासाठी जेसीबी सारखी वाहने वापरल्यास कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता.मतमोजणीसाठी आल्यावर तालुक्यातील वाहनांची गर्दी लक्षात घेता पोलिसांकडून महात्मा गांधी महाविद्यालयासमोरील मोकळे मैदान व फाळके पेट्रोल पंपाच्या शेजारील पार्किंगमध्ये आखलेल्या रेषेत वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.

तहसिलदार नानासाहेब आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करण्यात आले.निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांच्या पथकामध्ये महिलांचाही सामावेश होता मात्र संक्रांतीमुळे महिला कर्मचाऱ्याची ड्युटी रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आगळे यांनी घेतला त्यामुळे शिक्षक संघटनांमध्ये उत्साह निर्माण झाला.या पथकात असलेल्या शिक्षकांची भोजन व्यवस्था करण्यात आली होती. निवडणुकीसंदर्भात शिक्षकांना तीन प्रशिक्षणे देण्यात आली होती.त्यामुळे मतदानयंत्रांची हाताळणी करताना १७३ मतदान केंद्रावर कोणत्याही कर्मचाऱ्याने कोणतीही चुक केली नाही.वाहतूक व्यवस्थेमध्येही मायक्रो प्लॅनिंग करण्यात आले होते.कर्जत तहसीलपासुन संबंधित ग्रामपंचायतपर्यंत सुमारे ५६ मार्ग तयार ठेवले होते.यामध्ये १५ एस टी बस,३५ जीप व ९ स्कुल बस यामाध्यमातून कर्मचाऱ्यांची ने-आण मतदानकेंद्रापर्यंत करण्यात आली.याअगोदरच्या काळात याबाबत अशी शिस्त नव्हती.कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी तहसीलदार आगळे यांनी चांगले प्रयत्न केले.सुमारे २०० कर्मचारी या प्रक्रियेत गुंतल्यामुळे त्यांना आपले स्वतःचे मतदान करणे जिकिरीचे होऊन बसले होते मात्र अशा कर्मचाऱ्यांना २३३ टपाली मतपत्रिकांचे वाटप करण्यात आले.त्यामुळे कामाबरोबरच आपल्या हक्काच्या मतदानाचाही त्यांना आंनद घेता आला.मतमोजणीची प्रक्रिया देखील उत्कृष्ट राबवण्यात आली त्यामध्ये एकाच टेबलवर ग्रामपंचायतच्या संपुर्ण केंद्राची मत मोजणीची व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे सुटसुटीत कोणताही गोंधळ न होता १० मिनिटाच्या कालावधीतच ही प्रक्रिया पार पडत होती.सकाळी १० वाजता सुरू झालेली १७३ केंद्रांची संपुर्ण मतमोजणीची प्रक्रिया १२.३० पर्यंत पुर्ण झाली होती.वेगवेगळ्या पथकांची जबाबदारी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आली होती. त्यामध्ये आचारसंहिता पथक गटविकासाधीकारी अमोल जाधव यांच्याकडे तर टपालीचे संपुर्ण काम तालुका कृषी अधिकारी दिपक सुपेकर यांच्याकडे सोपविण्यात आले होते.मतदानप्रक्रिया नियंत्रण,कर्मचारी आदेश आणि मतपत्रिकेचे काम नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे यांच्याकडे होते.मतदान सुरक्षा कक्ष (स्ट्रॉंगरूम) नियंत्रण यामध्ये मतदानयंत्रांचे सेटिंग सिलिंग व ही यंत्रणा संबंधित ग्रामपंचायतीपर्यंत ने-आण करणे तसेच वाहतूक आराखडा ही जबाबदारी नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांनी पार पाडली.

    कर्जत प्रशासनात असलेल्या सर्वच तरुण अधिकाऱ्यांची सुसूत्रता,योग्य नियोजनाची चुनुक निवडणुकीच्या माध्यमातून पहावयास मिळाली.या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे आ.रोहित पवारांनी विशेष कौतुक केले आहे. एकंदरीत युवा आमदार आणि युवा अधिकाऱ्यांचा साधलेला हा समन्वय तालुक्याला विकासाकडे नेणारा आहे.

__________________________________

योग्य नियोजन आणि कार्यवाहीमुळे शक्य झाले- आण्णासाहेब जाधव,पोलीस उपअधीक्षक

        कर्जत,जामखेड व श्रीगोंदा या तीनही तालुक्यात निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी गाव पातळीवर बिट अंमलदार व अधिकारी यांच्याकडून गावभेटीचे आयोजन केले. निवडणुकीपुर्वीच उत्तमरित्या तयारी केल्यामुळे निवडणुकिच्या दिवशी आणि मतमोजणीनंतरही पुर्वनियोजन असल्याने कुठेही कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचली नाही.योग्य नियोजन आणि कार्यवाहीमुळे हे शक्य झाले.

___________________________________

पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसमवेत नियोजनबद्ध काम केले-चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक,कर्जत

          निवडणुकीच्या काळात कोणताही वाद विवाद होऊ नये म्हणून पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी कर्मचारी यांना बरोबर घेऊन नियोजनबद्ध काम केले.जास्त वाद विवाद असणाऱ्या गावांमध्ये दोन ते तीन बैठका घेतल्या. आमचे मोबाईल क्रमांक सामान्य नागरिकांना उपलब्ध करून दिले त्यामुळे पहिल्यांदाच अशा पोलीस व ग्रामस्थांच्या बैठका होत असल्याचा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.

___________________________________

कर्जतमध्ये पहिल्यांदाच असे नियोजन झाले-नानासाहेब आगळे, तहसिलदार कर्जत

        कर्जतच्या इतिहासात पहिल्यांदाच असे नियोजन झाले आहे.या अगोदर नियोजनाअभावी दिवसभर मत मोजणीचे काम सुरू राहायचे.प्रत्येकाला वेगवेगळ्या कामाची दिलेली जबाबदारी प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्याने उत्कृष्टरित्या पार पाडली.जे-जे शक्य होईल त्यासाठी प्रयत्न केले.सर्वांनीच एकजुटीने एकमेकांना सहकार्य केल्याने हे काम शक्य झाले त्या सर्वांचे आभार मानतो.

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy