पिंपळवाडीमध्ये रस्त्यावर अतिक्रमण, स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष
कर्जत (प्रतिनिधी)दिलीप अनारसे:- पिंपळवाडी येथे गावठाणात जाणाऱ्या रस्त्यावर होत असलेले खाजगी अतिक्रमण त्वरित थांबवावे अन्यथा कर्जत पंचायत समिती समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा चंद्रभान जंजिरे यांनी दिला आहे. आज त्यांनी गटविकास अधिकारी अमोल जाधव यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणं मांडले.
कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी येथे चंद्रभान चांगदेव जंजिरे यांची गावठाण हद्दीत जागा आहे. या जागेलगत गावात जाण्यासाठी शासकीय नकाशात नोंद असलेला रस्ता आहे. या रस्त्यावरच अशोक रामभाऊ खेडकर यांनी आपल्या संडास बाथरूम चे बांधकाम करत अतिक्रमन केले असून सदर गावठाणात जाणाऱ्या रस्त्यावर होत असलेले खाजगी अतिक्रमण त्वरित थांबवावे यासाठी पिंपळवाडीचे सरपंच, ग्रामसेवक यांना निवेदन दिले आहे. मात्र सदर व्यक्ती उपसरपंच रुख्मिनी रामदास जंजिरे यांची नातेवाईक असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून कारवाई करण्याचे टाळले जात आहे. सदर अतिक्रमण बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे अशी मागणी करत भाजपा किसान मोर्चाचे तालुका सरचिटणीस गणेश जंजिरे व किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव यांनी आज गटविकास अधीकारी अमोल जाधव यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. यावेळी गटविकास अधीकारी अमोल जाधव यांनी ग्रामसेवक यांना सम्पर्क साधून वस्तुस्थिती दर्शक अहवाल देण्याचे आदेश दिले. सध्या कोरोनाचा कठीण काळ सुरू आहे अवघ्या 15 टक्के कर्मचाऱ्यावर कामकाज सुरू आहे. याशिवाय विस्तार अधिकारी यांच्या कुटुंबामध्ये दु:खद घटना घडल्या आहेत त्यामुळे अडचणी आहेत, जरी सदरचे बांधकाम झाले तरी त्याची विस्तार अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाईल व वस्तुस्थितीजन्य स्थिती जाणून घेतली जाईल व अहवालात हे अतिक्रमण असल्याचे सिद्ध झाल्यास ते थेट पाडण्याचाही आदेश दिला जाऊ शकतो, अतिक्रमणाबाबतची संपूर्ण जबाबदारी ग्राम पंचायतची आहे त्यामुळे सध्याच्या अडचणी संपल्या की त्याबाबत त्वरित योग्य तो निर्णय घेतला जाईल असे ही जाधव यांनी सांगितले. आगामी काळात सदरचे अनधिकृत होत असलेले अतिक्रमणातील बांधकाम जैसेथे न थांबल्यास आम्ही पंचायत समिती समोर अमरन उपोषण करू असा इशारा ही यावेळी भाजपा किसान मोर्चाचे तालुका सरचिटणीस गणेश जंजिरे यांनी दिला आहे.
*चौकट*
★ *माजीमंत्री प्रा राम शिंदेनी घातले लक्ष*
पिंपळवाडी येथील भाजपा कार्यकर्त्याच्या अर्जावर प्रशासन योग्य पद्धतीने कारवाई करत नसल्याचे लक्षात आल्यानंतर माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांनी याबाबत गटविकास अधिकारी जाधव यांच्या बरोबर दूरध्वनी वरून संवाद साधला व योग्य पद्धतीने न्याय देण्याची मागणी केली.