सर्वत्र कोरोनाने थैमान , मात्र जिल्ह्यातील काही गावे तहानेने व्याकूळ
राज्यासह जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे, मात्र जिल्ह्यातील काही गावे तहानेने व्याकूळ झालेली असून त्यांना कोरोनापेक्षा पाणीटंचाईचे संकट मोठे वाटत आहे. घोटभर पाण्यासाठी अनेक गावांचा आटापिटा चाललेला आहे. मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करताना दिसत आहेत. तालुक्याच्या मुख्यालयापासून १३ किमी अंतरावर वसलेल्या निंबे ग्रामपंचायतमधील सुमारे 150 कुटुंबांचे निंबे गाव मार्चच्या सुरुवातीपासून पाणीटंचाईचा सामना करीत आहे.निंबे गावची पाणीटंचाईची समस्या आता उग्र बनली असून महिनाभरापूर्वीच पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे, परंतु अद्यापही उपलब्ध करून दिले नसल्याने स्थानिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. परिणामी घोटभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालून रात्री-अपरात्री महिला-पुरुष लहानग्यांना विहिरीत उतरून पिण्याच्या पाण्यासाठी आटापिटा करताना दिसत आहेत. प्रशासनाने वेळेत टँकरने पाणी पुरवले नाही तर आमच्याकडे कोरोनाने नव्हे तर पाणीटंचाईचे बळी जातील, याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थांनी बोलताना व्यक्त केला आहे.