Karjat: मजुरांची टंचाई व हमी भाव याचा विचार करून कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी गहू, हरभरा व कांदा यांना प्राधान्य दिले आहे
(-कर्जत प्रतिनिधी – दिलीप अनारसे)– कर्जत तालुक्यात मजुरांची टंचाई व हमी भाव याचा विचार करून कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी गहू, हरभरा व कांदा यांना प्राधान्य दिले आहे यामुळे या पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे तर ज्वारीचे पेरणी क्षेत्र घटले आहे. कुकडीच्या पाण्याच्या भरोशावर शेतकऱ्यांनी पिकांचे नियोजन केले मात्र अद्याप कुकडीचे एकही आवर्तन आले नाही यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. कर्जत तालुका हा रब्बीचा तालुका म्हणून ओळखला जातो. यामुळे याभागात रब्बीची पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात, गेल्या दहा बारा वर्षात कर्जत तालुक्याला कुकडीचे आवर्तन नियमितपणे येत आहे. यामुळे कर्जत तालुक्यातील बागायती क्षेत्र वाढले आहे. प्रत्येक शेतकऱ्याने आपली शेती बागायती केली आहे. पुर्वी शेती होती पण तीला पाणी उपलब्ध नव्हते असे शेतकरी मजुरी करत होते पण अलिकडील काळात प्रत्येकाच्या शेतीला पाणी मिळू लागले यामुळे कोरडवाहू शेतकरी बागायतदार शेतकरी झाले यामुळे त्यांनी मजुरी करने बंद केले व आपल्याच शेतीकडे लक्ष केंद्रित केले. यामुळे मजुर टंचाई निर्माण झाली. मजुर टंचाई निर्माण झाल्यामुळे कमी मजुर व हमीभाव यांचा विचार करून शेतकऱ्यांनी हरभरा व गहु या पिकांना प्राधान्य दिले. तसेच कर्जत तालुक्यात कांद्याचे पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते यामुळे हरभरा, गहु व कांदा या पिकांच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. गेल्या पावसाळ्यात कर्जत तालुक्यातील विविध भागात समाधानकारक पाऊस झाला होता. शिवाय कुकडीचे पाणी येते या भरोशावर शेतकऱ्यांनी पिकांना पाणी दिले पण दुर्दैवाने यावर्षी घोड व कुकडीचे एकही आवर्तन आले नाही यामुळे घोड व कुकडीच्या लाभक्षेत्रातील पिके पाण्याअभावी सुकली आहेत यामुळे याभागातील पिकांचे उत्पादन घटनार आहे. प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात पर्यन्त कुकडी व घोडची दोन आवर्तने प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात पर्यन्त कुकडी व घोडची दोन आवर्तने सुटत असतात पण यावर्षी एकही आवर्तन आले नाही. यामुळे शेतकऱ्यांचे शेतीचे गणित कोलमडले आहे. ज्वारीचे पिक काढायला आले, हरभरा व गहू भरत आहे तरी कुकडीचे आले नाही यामुळे पिकांना पाणी देता आले नाही यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कुकडी व घोडचे आवर्तन सोडने गरजेचे आहे. गेल्या हंगामात उडीद, मका तसेच तुरीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर झाले होते. रब्बी हंगामात मात्र बदलत्या हवामानाचा फटका बसू शकतो अशी शक्यता आहे कारण अवकाळी पाऊस पडला यामुळे आवश्यक त्या प्रमाणात थंडी पडली नाही. शिवाय हरभरा पिकावर घाटे आळी आली आहे. मजुरांच्या समस्येमुळे फळबागा लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. राज्य सरकारने फळबागा लागवडीची मुदत वाढवून दिली आहे गरजुंनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी अधिकारी दीपक सुपेकर यांनी केले आहे. ( सध्या हरभरा व कांदा या दोन प्रमुख पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यावर काय उपाययोजना करावी याबाबत कृषी विभागाचे कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी, कृषी सहायक हे सर्व जण ज्या त्या भागात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत – दिपक सुपेकर – कर्जत तालुका कृषी अधिकारी) कर्जत तालुक्यातील पिकनिहाय क्षेत्र हेक्टर मध्ये असे – ज्वारी – 41598, मका – 4285, ऊस – 11528, कांदा – 10504, गहू – 9574, हरभरा – 14986, फळबागा – 6730, भाजीपाला – 12337, चारापिके – 4651, तेलबिया – 43.