पुणे: काळेवाडी येथे हुंड्यासाठी छळ, विवाहितेने गळफास घेऊन संपवले जीवन.

0
Add a heading (6)

पुणे, २९ जुलै २०२५: काळेवाडी येथील ज्योतीबानगरमध्ये एका ३० वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती कारणावरून छळ आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी सातत्याने होणारा तगादा याला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पतीसह सासरच्या चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा तपशील
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत निर्मला परमेश्वर वाघमारे (वय ३० वर्षे) हिने २० जुलै २०२५ रोजी सकाळी ११:३० ते १२:३० वाजण्याच्या सुमारास काळेवाडी, ज्योतीबानगर येथील नंदकुमार राऊत यांच्या रूममध्ये, प्रेरणा बँकेजवळ, राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सन २०२० पासून घडलेल्या छळाच्या मालिकेचा परिणाम असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.

या प्रकरणी निर्मलाचा भाऊ प्रकाश दादाराव वाघमारे (वय ३३, रा. तळवडे, पुणे) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, निर्मलाचा विवाह आरोपी परमेश्वर श्रावण वाघमारे (वय ४०, रा. जगळपूर बुरा, ता. जळकोट, जि. लातूर) याच्याशी झाल्यानंतर जेमतेम तीन वर्षांनंतर, पती परमेश्वर, सासू गवळणबाई श्रावण वाघमारे, दिर कमलाकर श्रावण वाघमारे आणि नणंद रमाबाई लेंडेगावकर (सर्व रा. जगळपूर बुरा, ता. जळकोट, जि. लातूर) यांनी आपापसात संगनमत करून निर्मलाचा छळ करण्यास सुरुवात केली.

आरोपींनी निर्मलाला प्रापंचिक कारणांवरून घालून-पाडून बोलणे, घर बांधण्यासाठी आणि नवीन दुचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी वेळोवेळी तगादा लावणे, तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करणे असे प्रकार केले. निर्मला कामाला जाऊ लागल्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ केली आणि हाताने मारहाण देखील केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून निर्मलाने आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांची कारवाई
काळेवाडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३१०/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १०८, ८५, ११५ (२), ३५२, ३५१(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

कौटुंबिक हिंसाचार आणि छळाचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा या घटनेतून अधोरेखित झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *