Pune News : हॉटेलचे बिल देण्यावरुन वाद, मित्रांनीच केली मित्राची हत्या

0

पुणे, देहुरोड (Dehu Road News): पुणे-पिंपरी चिंचवड शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तळवडे येथील एका हॉटेलमध्ये दारुचे बिल देण्यावरून झालेल्या किरकोळ वादामुळे मित्रांनीच मित्राची निर्घृण हत्या (Murder) केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. देहुरोड पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे, तर एकाचा शोध सुरू आहे.

नेमकी घटना काय घडली?

ही घटना १९ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास देहू-आळंदी रोडवरील ‘सम्राट गार्डन हॉटेल’मध्ये घडली. मयत गणेश लक्ष्मण पोखरकर (वय ३४, रा. देहूगाव) हे त्यांचे मित्र आरोपी विनोद मोरे, गोरख कुटे, संतोष मराठे आणि चंद्रकांत बुट्टे यांच्यासोबत दारू पित बसले होते.

दारू पिल्यानंतर हॉटेलचे बिल देण्यावरुन त्यांच्यात जोरदार वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की, आरोपी विनोद मोरे याने रागाच्या भरात हॉटेलमधील लाकडी दांडका घेऊन गणेशच्या पाठीवर, पोटावर आणि छातीवर मारहाण केली.

चारही मित्रांनी मिळून केला जीवघेणा हल्ला

पहिल्या मारहाणीनंतर गणेश पुन्हा आरोपी विनोद मोरेच्या अंगावर जात असताना, त्याचे इतर मित्रही या भांडणात सामील झाले. आरोपी गोरख कुटे, संतोष मराठे आणि चंद्रकांत बुट्टे यांनी संगनमत करून गणेशला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने गणेशचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. देहुरोड पोलीस स्टेशनमध्ये पोलीस हवालदार संतोष बांबळे यांनी फिर्याद दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *