Brothers fight over pani puri shop : पाणी पुरीच्या गाड्यावरून सख्या भावांचे भांडण ! डोक्यात घातला सिमेंटचा गट्टू !
काळेवाडी, दि. २३ (प्रतिनिधी) – पाणीपुरीची हातगाडी लावण्यावरून झालेल्या वादातून एका भावाने आपल्याच सख्ख्या भावावर सिमेंटच्या गट्टूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना काळेवाडी येथे घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाला असून, भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्याच्या पत्नीलाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी काळेवाडी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.Brothers fight over pani puri shop
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकांत सुरेश गिरमकर (वय ३३) आणि त्यांचा मोठा भाऊ श्रीकांत सुरेश गिरमकर (वय ३६) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरीच्या हातगाडीवरून वाद सुरू होता. १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला. साईसागर कॉलनी नं. २, छत्रपती चौकाजवळ, रहाटणी येथे फिर्यादीच्या घरासमोरच आरोपीने वाद घालण्यास सुरुवात केली.
रागाच्या भरात आरोपी श्रीकांतने फिर्यादीला शिवीगाळ करत “आज तुला मारूनच टाकतो” अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने रस्त्यावर पडलेला सिमेंटचा गट्टू हातात घेऊन फिर्यादीच्या डोक्यात तीन वेळा जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात शशिकांत गंभीर जखमी झाले. ते खाली पडल्यानंतरही आरोपीने गट्टू आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरू ठेवली.
पतीला मारहाण होत असल्याचे पाहून फिर्यादीची पत्नी, सौ. सोनाली, भांडण सोडवण्यासाठी मध्ये आली. त्यावेळी आरोपी क्रमांक दोन, सुवर्णा श्रीकांत गिरमकर (वय २८), हिने सोनालीचे केस धरून तिला जमिनीवर पाडले. शिवीगाळ करत हाताने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच “तुझ्याकडे बघून घेते,” अशी धमकीही दिली.
या घटनेनंतर शशिकांतने काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ११८ (२), ११५ (२), ३५२, ३५१(२)(३) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.