पुणे: मैत्रीच्या नावाने केलेल्या एका विश्वासघातामुळे एका तरुणाला आपला जीव धोक्यात घालावा लागल्याची गंभीर घटना महाळुंगे एमआयडीसी परिसरात घडली आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादामुळे एका मित्राने दुसऱ्या मित्राला जुन्या इंद्रायणी नदीच्या पुलावरून नदीत फेकून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
नेमके काय घडले? ही घटना १३ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी सिद्धार्थ भानुदास बोडके (वय ३७) यांना आरोपी मोहन तुकाराम जाधव (वय ३४) याने ‘दारू पिण्यास चल’ असे म्हणून आपल्या रिक्षात बसवले. वाटेत ‘आज तुला जिवंत सोडणार नाही’ असे म्हणत मोहनने सिद्धार्थला धमकावले.
त्यानंतर ते मोशी येथील हॉटेल तळजा भवानी येथे गेले, जिथे मोहनने सिद्धार्थला दारू पाजली. तिथे त्यांच्यात जोरदार शिवीगाळ आणि वाद झाला. सिद्धार्थने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण मोहनने ऐकले नाही. त्यानंतर मोहनने त्याला आपल्या रिक्षात बसवून मोशी टोलनाक्याजवळील जुन्या इंद्रायणी नदीच्या पुलावर नेले.
पुन्हा वाद सुरू झाल्यावर मोहनने सिद्धार्थला रिक्षातून बाहेर ओढले आणि हाताने चापटा मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर रिक्षातील लोखंडी रॉड काढून त्याने सिद्धार्थला मारहाण केली. रॉडचा फटका त्याच्या डाव्या हाताच्या मनगटावर बसला आणि तो खाली बसला. याच वेळी जिवे मारण्याच्या उद्देशाने मोहनने त्याला उचलून पुलावरून थेट इंद्रायणी नदीपात्रात फेकून दिले.
पोलिसांनी केली कारवाई या गंभीर गुन्ह्याची तक्रार १४ सप्टेंबर २०२५ रोजी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मोहन तुकाराम जाधव याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि महाडीक करत आहेत.