पिंपरी-चिंचवड: पिस्तूल साफ करत असताना अचानक गोळी सुटून एका तरुणाला गंभीर दुखापत झाल्याची एक धक्कादायक घटना तळेगाव एमआयडीसी परिसरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
काय घडले नेमके? ही घटना १३ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री अंदाजे ७.३० वाजता घडली. कलाडिफेन्स कंपनीजवळून इमर्सन कंपनी रोडने दोघे तरुण आपल्या खोलीकडे जात असताना ही घटना घडली. आरोपी विजय कुमार (वय २८) आणि मंजरिन रजिफ मिया (वय २४) यांच्याकडे बेकायदेशीरपणे ३५,००० रुपये किमतीचे एक पिस्तूल होते.
पावसात भिजल्यामुळे विजय कुमार हे पिस्तूल साफ करत असताना ते लोड झाले. त्यानंतर मंजरिन मियाने विजयकडून पिस्तूल घेतले आणि साफ करत असताना, नकळत त्याच्याकडून ट्रिगर दाबला गेला. यामुळे पिस्तूलमधून सुटलेली गोळी थेट विजय कुमारच्या कमरेच्या वरच्या भागात लागली. या घटनेत विजय गंभीर जखमी झाला.
कायदेशीर कारवाई या प्रकरणी, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात १४ सप्टेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिस्तूल बेकायदेशीरपणे बाळगल्याबद्दल आणि निष्काळजीपणामुळे दुसऱ्याचा जीव धोक्यात घातल्याबद्दल आरोपींविरुद्ध भा.न्या.सं. २०२३ कलम १२५ (ड), २३८, २४०, ३(५) तसेच आर्म अॅक्ट कलम ३ (२५) आणि म.पो.का. कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मंजरिन रजिफ मिया याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
या घटनेने शहरात बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगण्याचे प्रमाण किती वाढत आहे, यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.