पिंपरी चिंचवड पोलिसांनी अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करत सांगवी आणि वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील दोन स्पा सेंटरवर टाळे ठोकले आहे. न्यू ओम स्पा (NEW OM SPA) आणि रुपेन स्पा (RUPEN SPA) या दोन्ही स्पा सेंटरमध्ये बेकायदेशीर वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचे आढळून आल्याने, मा. पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे यांच्या आदेशाने ही केंद्रे दिनांक ०७/११/२०२५ पासून पुढील एक वर्षासाठी बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे पिंपरी चिंचवड परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांना एक कडक इशारा मिळाला आहे.
पहिल्या घटनेत, पिंपळे सौदागर येथील व्हिजन गॅलरी मॉलमध्ये असलेल्या न्यू ओम स्पा (NEW OM SPA) शॉप नं- ३०९ येथे अवैधरित्या स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला (AHTU), गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सांगवी पोलिसांनी छापा टाकत आकाश सुरेश साळवे आणि संदीप संतोष तिवारी यांना अटक केली. त्यांच्यावर सांगवी पो.स्टे.गु.र.नं- १५५/२०२४ भादवि कलम ३७० (३), ३४ सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ च्या कलम ३,४,५,७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हे स्पा सेंटर सार्वजनिक ठिकाणाजवळ असूनही येथे बेकायदेशीरपणे वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याने, सांगवी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी ते बंद करण्याबाबतचा प्रस्ताव मा. पोलीस आयुक्त कार्यालयाकडे पाठवला होता.
त्याचप्रमाणे, वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील काळेवाडी फाटा येथील सॉलिटेअर बिझनेस हबमधील रुपेन स्पा (RUPEN SPA) ऑफिस नं- ३९ येथेही अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती AHTU ला मिळाली. यावर कार्यवाही करत, त्यांनी वाकड पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. या कारवाईत शैला कलप्पा कांबळे नावाच्या महिला आरोपीला ताब्यात घेण्यात आले. तिच्यावर वाकड पोलीस स्टेशन गु.र.नं. २३५/२०२५ भा.न्या.सं २०२३ च्या कलम १४३ (२), (३), ३(५) सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ च्या कलम ३,४,५,७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे स्पा सेंटरही सार्वजनिक ठिकाणाजवळ असल्याने, वाकड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी ते बंद करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता.
दोन्ही स्पा सेंटर्स बंद करण्याबाबत प्राप्त झालेल्या प्रस्तावांची मा. पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड श्री विनय कुमार चौबे यांनी गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी दोन्ही प्रकरणांची प्राथमिक चौकशी करून दाखल गुन्ह्यांमधील कागदपत्रांचे अवलोकन केले. चौकशीअंती, दोन्ही स्पा चालक-मालक सार्वजनिक ठिकाणांच्या आजूबाजूला असूनही त्यांच्या केंद्रांमध्ये बेकायदेशीर वेश्याव्यवसाय चालवत असल्याचे स्पष्ट झाले. यावर कठोर पाऊल उचलत, पोलीस आयुक्तांनी न्यू ओम स्पा आणि रुपेन स्पा यांना दिनांक ०७/११/२०२५ पासून पुढील एक वर्षासाठी बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस नागरिकांची सुरक्षा आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी कटिबद्ध असून, अशा अवैध धंद्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत यातून मिळाले आहेत.





