महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांना आवश्यकतेप्रमाणे अर्थसहाय्य उपलब्ध करून दिल्यास त्यांना संजीवनी मिळेल तसेच याद्वारे अन्य महिलांना देखील रोजगार उपलब्ध होईल. महिला नेतृत्वातील स्टार्टअपमुळे स्थानिक गरजेवर आधारित व स्थानिक कच्चा माल उपलब्धतेवर आधारित स्टार्टअप विकसित होऊ शकतील. स्टार्टअप विकासाद्वारे महिलामध्ये आत्मनिर्भरता वाढवून त्यांचा स्टार्टअपच्या विकासाच्या माध्यमातून उद्योगाचा व्यावसायिक दृष्टिकोण विकसित होईल. तसेच शहरी व ग्रामीण पातळीपर्यंत देखील स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासामध्ये वाढ होईल.
याकरीता महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांना आर्थिक पाठबळ देण्याची आवश्यकता असून याकरीता राज्यामध्ये “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना” सुरु करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना प्रारंभिक टप्प्यावरील पाठबळ देण्यासाठी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना” राज्यामध्ये राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.
योजनेचे उद्दिष्ट व स्वरूपः
- महाराष्ट्र राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना पाठबळ देणे.
- राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स व नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या स्टार्टअप्सना व्यवसाय वृद्धीसाठी तसेच विस्तार करण्यासाठी एक वेळेस अर्थ सहाय्य करणे.
- राज्यातील महिला स्टार्टअप्सला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे.
- देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप्स असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे.
- महिला स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देऊन बेरोजगारी कमी करणे.
- या योजनेतील एकूण तरतूदीच्या २५ टक्के इतकी रक्कम शासनाद्वारे विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या मागासवर्गातील महिला, आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील महिलांकरीता राखीव ठेवण्यात येईल.
- राज्यातील महिला नेतृत्वातील प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सना त्यांच्या उलाढालीनुसार किमान रू.१ लाख ते कमाल रू. २५ लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येईल.
योजनेतील लाभार्थी पात्रता
- उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, भारत सरकार (Department for Promotion of Industry & Internal Trade) मान्यता प्राप्त महाराष्ट्र नोंदणीकृत महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स.
- सदर स्टार्टअप मध्ये महिला संस्थापक / सह संस्थापक यांचा किमान ५१% वाटा असणे आवश्यक आहे.
- महिला नेतृत्वातील स्टार्टअप किमान एक वर्षापासून कार्यरत असावा.
- महिला नेतृत्वातील स्टार्टअपची वार्षिक उलाढाल रु. १० लाख ते रू. १ कोटी पर्यंत असावी.
- महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांनी राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमधून अनुदान स्वरूपातील आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
सदर योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांना अंमलबजावणी संस्था म्हणून घोषीत करण्यात येत आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना