---Advertisement---

पुणे-नाशिक महामार्गावर ‘भाईगिरी’चा थरार: पेट्रोल पंपावर हप्ता मागितला, कर्मचाऱ्यांना मारहाण!

On: September 1, 2025 1:30 PM
---Advertisement---

 पुणे-नाशिक महामार्गावरील (Pune-Nashik Highway) चाकणजवळच्या (Chakan) एका पेट्रोल पंपावर ‘भाईगिरी’ करत हप्ता मागणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मोफत पेट्रोल आणि ५००० रुपयांच्या हप्त्यासाठी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्रप्त माहितीनुसार, दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १२:२५ वाजण्याच्या सुमारास, देवेंद्र अॅटो लायन्स, भारत पेट्रोल पंप, भंडारा हॉटेल शेजारी, गवते वस्ती, मेदनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे येथे ही घटना घडली. फिर्यादी सचिन शिवाजी बिरादार (वय ३०), जे पेट्रोल पंपावर नोकरी करतात, वाहनांमध्ये पेट्रोल भरण्याचे काम करत होते. त्यावेळी आरोपी अतुल अर्जुन तांचे (वय १९, रा. चाकण), सोहम श्रीकांत माने (वय १८, रा. वराळे) आणि ओंकार सुरेश बागल (वय २०, रा. देहू गाव) यांनी फिर्यादीकडे ९० रुपयांचे पेट्रोल फुकट भरून घेतले.

त्यानंतर आरोपींनी, “येथे पेट्रोल पंप चालवायचे असल्यास आम्हाला ५००० रुपये हप्ता द्यावा लागेल, नाहीतर पेट्रोल फुकटात भरावे लागेल,” असे बोलून पैशाची मागणी केली. फिर्यादी बिरादार यांनी याला विरोध केला असता, आरोपींनी त्यांना हातातील कोणत्यातरी कठीण वस्तूने मारहाण करून जखमी केले. भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या त्यांच्या सहकाऱ्यालाही आरोपींनी हाताबुक्याने मारहाण करून शिवीगाळ केली.

यावेळी आरोपींनी मोठ्याने ओरडून, “आम्ही इथले भाई आहोत, इथे पंप चालवायचे असल्यास आम्हांला हप्ता द्यावा लागेल,” असे बोलल्याने पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेले वाहनचालक घाबरून पळून गेले. या घटनेमुळे फिर्यादी बिरादार यांना मानसिक आणि शारीरिक त्रास झाला आहे.

चाकण पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (२), ११५ (२), ११८ (१), ३५१ (२), ३५१ (३), ३ (५) आणि फौजदारी सुधारणा कायदा कलम ३७ प्रमाणे गुन्हा (गु. रजि. नं. ६२२/२०२५) दाखल केला आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, पोउपनि बोरकर (मो. नं. ९४०३६३६३८३) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Editorial Team

Pune City Live या वेबसाईटचे आपल्या वेबसाईटसाठी विविध क्षेत्रांतील बातम्या आणि लेख लिहितात. त्यांच्या लेखणीतून पुण्यातील विविध घडामोडी, घडामोडींची विश्लेषणे, तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment