पुणे, १० सप्टेंबर: पुणे जिल्ह्यातील हिंजवडी (Hinjewadi) येथे एका सेल्समनला त्याच्या कामाचे पैसे आणि इन्सेंटिव्ह मागितल्यामुळे त्याला ‘महार’ जातीचा म्हणून अपमानित करण्यात आले. आरोपीने जातीवाचक शिवीगाळ करून त्याला मारहाण केली. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत (Atrocity Act) गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण?
ही घटना ६ मे, २०२५ रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास हिंजवडीतील लक्ष्मी चौक येथील ‘रिदम ऑटो’ या दुकानात घडली. फिर्यादी किशोर सुधाकर बागडे (वय ३९), जे महार समाजाचे आहेत, यांनी हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी या दुकानात सेल्समन म्हणून काम करतात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किशोर बागडे त्यांच्या कामाचे पैसे आणि इन्सेंटिव्ह घेण्यासाठी आरोपी नीरज शितल शहा (वय ३७) यांच्याकडे गेले होते. त्यावेळी आरोपी नीरज शहाने त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. “ये महारड्या, तुझी जातच तशी आहे,” असे म्हणून त्याने फिर्यादीला मारहाण केली आणि त्याला दुकानातून हाकलून दिले.
या प्रकरणी, पोलिसांनी आरोपी नीरज शहा याच्याविरोधात हिंजवडी पो.स्टे. गु.र.नं. ६५५/२०२५ नुसार, भारतीय न्याय संहिता कलम ३५२, ३५१(२) आणि अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा कलम ३(१)(एस) नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.