पुणे, ९ सप्टेंबर: पुणे जिल्ह्यातील मारुंजी येथे एका तरुणाचे चाकूच्या धाकावर अपहरण (Kidnapping) करून त्याच्याकडून २५ हजार रुपयांची खंडणी (Extortion) घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
ही घटना ५ सप्टेंबर, २०२५ रोजी रात्री ७.४५ ते १०.०० वाजताच्या दरम्यान मारुंजी येथे घडली. फिर्यादी लालबाबुकुमार रामइक्बाल प्रसाद (वय २८), जे सेंट्रिंगचे काम करतात, त्यांनी हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी त्यांचे काम संपवून घरी जात असताना आरोपीने त्याला रस्त्यात अडवले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश सत्यवान तापकीर (वय २९) याने फिर्यादीच्या गळ्याला चाकू लावला. त्याने त्याला जबरदस्तीने नेक्सॉन गाडीमध्ये बसवून त्याचे अपहरण केले. आरोपीने फिर्यादीला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडून २५,००० रुपये जबरदस्तीने घेतले.
या प्रकरणी, पोलिसांनी आरोपी आकाश सत्यवान तापकीर याला तात्काळ अटक केली आहे. त्याच्यावर हिंजवडी पो.स्टे. गु.र.नं. ६५३/२०२५, भा.न्या. सं. कलम १४०(२), ३०८(५), ३५१(२), ३५२, सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम ३ व ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक वांगणेकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.