---Advertisement---

पिंपरी चिंचवड सायबर सेलची कारवाई: आठवडाभरामध्ये ४ कोटींची फसवणूक उघडकीस

On: June 30, 2024 9:26 AM
---Advertisement---

पिंपरी चिंचवड, ३० जून २०२४: पिंपरी चिंचवड सायबर सेलने गेल्या आठवड्यात ३ गुन्ह्यांमध्ये एकूण ४ कोटी रुपयांची फसवणूक उघडकीस आणत ८ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत मेटल कॉईन्स, बनावट अॅपद्वारे शेअर मार्केट आणि ऑनलाइन टास्क फ्रॉडचा समावेश आहे.

रावेत येथील फिर्यादींनी फेसबुकवर मेटल कॉईन्समध्ये गुंतवणुकीच्या लिंकवर क्लिक केल्यावर, त्यांना तिप्पट परताव्याचे आमिष दाखवून २ कोटी १० लाख रुपयांची फसवणूक केली गेली. विनविन कार्पोरेशन नावाच्या कंपनीच्या सोनी साह यांच्यावर फसवणुकीचा आरोप असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाकड येथील फिर्यादींची बनावट अॅपद्वारे शेअर मार्केटमध्ये ९९ लाख रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणात रिषन एंटरप्रायझेसच्या बैंक अकाउंटमधून ग्लोबल हॉरिझॉन इंटरनॅशनल कंपनीच्या अकाउंटवर पैसे गेल्याचे निष्पन्न झाले आहे. गोम्स फॉरेक्स सर्विसेस इंडियाचे प्रोप्रा स्टिफन गोम्स आणि चिरायु फॉरेक्स कंपनीचे कमलेश माळी यांना फसवणुकीच्या बदल्यात युएसडीटी फिजिकल करन्सी दिल्याचा आरोप आहे.

ऑनलाइन टास्क फ्रॉडद्वारे ८९,६१,१८९ रुपयांची फसवणूक प्रकरणात आरोपी कन्हैया कनोजिया, आदिल अन्दर खान, आणि रियान अर्शद शेख यांना पिंपरी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. कन्हैया कनोजियाच्या ७ बैंक खात्यावर पूर्ण भारतभरातून ५० तक्रारी प्राप्त आहेत. आरोपींनी अंदाजे ३ ते ४ कोटी रुपये रक्कमेचा अपहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सदर कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त संदिप डोईफोडे, आणि सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात वपोनि वैभव शिंगारे, सपोनि प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण आणि अन्य अधिकाऱ्यांचा समावेश होता.

सायबर गुन्हयांना बळी पडू नये यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलेल्या फसव्या लिंकला क्लिक न करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले आहे.

Editorial Team

Pune City Live या वेबसाईटचे आपल्या वेबसाईटसाठी विविध क्षेत्रांतील बातम्या आणि लेख लिहितात. त्यांच्या लेखणीतून पुण्यातील विविध घडामोडी, घडामोडींची विश्लेषणे, तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment