पिंपरी: सोशल मीडियावर पिस्तुलासह रील बनवून व्हायरल करणे पडले महागात; सांगवी पोलिसांनी आरोपीला केली अटक

0
insta_reel

पिंपरी-चिंचवड: सोशल मीडियावर हातात पिस्तूल घेतलेला व्हिडिओ व्हायरल करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे सांगवी पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून एक देशी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

ही घटना जुनी सांगवी येथे उघडकीस आली. आरोपी ओम ऊर्फ नन्या विनायक गायकवाड (वय २१) याच्या हातात देशी बनावटीचे पिस्तूल असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता. याची माहिती मिळताच सांगवी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने तपास सुरू केला.

पोलिसांनी ओम गायकवाड याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने तो व्हिडिओ त्याचाच असल्याचे कबूल केले. त्याने सांगितले की, हे पिस्तूल त्याचा मित्र आशिष वाघमारे याचे असून, पकडण्याच्या भीतीने आशिषने ते आपल्याकडे लपवण्यासाठी दिले होते.

आरोपीच्या माहितीनुसार, पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याने औंध जिल्हा रुग्णालयाजवळ लपवून ठेवलेले ३०,०००/- रुपये किंमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि १,०००/- रुपये किंमतीचे एक जिवंत काडतूस जप्त केले.

या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात आरोपी ओम गायकवाडविरोधात भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. सोशल मीडियावर असे गैरकृत्य करून रील बनवणाऱ्यांवर पोलिसांची नजर असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed