वीकेंड स्पेशल बनवा हा झटपटीत ‘पिझ्झा पराठा’ जो आहे टेस्टी आणि आरोग्यासाठी हेल्दी.
पुणे, दि.16 डिसेंबर,2023: आजकाल मुलांच्या खाण्यापिण्याच्या आवडी निवडी बदलत चालल्या आहेत.चपाती, भाजी व त्यातही हिरवी पालेभाजी खायला दिली की ते चेहरे करतात. त्यातही वीकेंड म्हंटल की त्यांना काहीतरी ट्विस्ट हवं असते.अशा वेळी त्यांना त्यांचा आवडीचा पदार्थ तर द्यायचा पण तो आरोग्यासाठीही चांगला असला पाहिजे मग तो बनवण्यासाठी सगळ्या आईंची तारेवरची कसरत चालू असते. तर चला मग आज तुमच्या या प्रॉब्लेमचा उपाय काढणारा एक आगळा वेगळा पदार्थ जाणून घेऊया. या पदार्थाचं नाव आहे ‘पिझ्झा पराठा’.मुले आजारी असो किंवा खुप कमी जेवणारी, पिझ्झा म्हंटल की त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद येतो. पण बाजारातील पिझ्झा, बर्गर या जंकफूडने मुलं आजारी पडण्याचे चान्स जास्त असतात आणि बाहेरचे फास्ट फूड खाणे नको असणाऱ्या चरबीला आमंत्रण देने होय. त्यामुळे आज या पिझ्झा पराठा रेसिपीद्वारे तुम्ही तुमच्या मुलांना हवं तेव्हा हुबेहुब पिझ्झा सारखा लागणारा पदार्थ देऊन खुश करू शकता. चला तर मग जाणून घेऊया ‘पिझ्झा पराठा’ची रेसिपी.
पिझ्झा पराठा साठी लागणारे साहित्य(Ingredients)
गव्हाचं पीठ – 4 कप
साखर – 2 चमचे
तेल – 4 चमचे
यीस्ट – 2 चमचे
मीठ – चवीनुसार
कोमट पाणी- आवश्यकतेनुसार
सिमला मिरची -1 कप बारीक चीरलेली
कोबी – 1 कप बारीक चिरलेली
हिरवी मिरची – 1 बारीक चिरून
पिझा सॉस – आवश्यकतेनुसार
कांदा – 1 बारीक चिरलेला
मोझरेला चीज 1 कप किसलेला
बेबी कॉर्न- 1 चिरुन
काळी मिरी पावडर – अर्धा चमचा
पिझ्झा पराठा बनवण्याची कृती :
सर्वप्रथम पिठामध्ये यीस्ट, मीठ, तेल व साखर घालून थोडे थोडे कोमट पाणी घालुन पीठ सॉफ्ट होईपर्यंत मळुन घ्या. त्यानंतर त्याला थोडे तेल लावून कपड्याने 1 तास झाकुन ठेवा. कणिक चांगली तयार होईपर्यंत एका मोठ्या भांड्यात शिमला मिरची, कॉर्न, कोबी, कांदा,चीज, मिरची, मीठ (चवीनुसार)या सर्व भाज्या मिक्स करा. त्यानंतर तयार पिठाचे पराठाच्या आकाराचे गोळे बनवून गोल लाटून घ्या. लागलेल्या पराठाच्या अर्ध्या बाजूला पिझ्झा सॉस लावा व वरील मिक्स केलेल्या सर्व भाज्या सॉस वरती योग्य प्रमाणात टाका. भाज्या टाकून झाल्यावर पराठ्याच्या बाजूने गोल हलके पाणी लावा व उरलेला अर्धा भाग फोल्ड करा म्हणजे पराठा भाजताना उकलणार नाही. फोल्ड केलेल्या पराठ्याला हलके हाताने प्रेस करा व दोन्ही बाजूने पराठा कमी आचेवर वरती तेल लावून चांगला कुरकुरीत भाजून घ्या. तसेच गोल आकाराचे 2 पराठे बनवून एक पराठा वर सॉस व भाज्या टाकून दुसरा पराठा त्यावरती ठेऊनही भाजून घेऊ शकता व भाजलेला पराठा खाताना कट करू शकता. तुमचा मुलांसाठी खास तयार ‘पिझ्झा पराठा’ सॉस सोबत खायला तयार आहे.
टिप :
पिझ्झा पराठा मध्ये तुम्ही वरील भाज्यांसोबत पालक , गाजरही टाकू शकता. म्हणजे पराठा अजूनच पोष्टीक होईल
पराठा कमी आचेवर तळूनही घेऊ शकता.