पुणे | 14 मे 2025: भारतीय सैन्याच्या “ऑपरेशन सिंदुर” या यशस्वी कारवाईनंतर देशात दहशतवादी संघटनांकडून संभाव्य प्रतिहल्ल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा पार्श्वभूमीवर पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे पोलिसांनी माहिती दिली आहे की, देशातील महत्त्वाची धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे आणि व्हीव्हीआयपी व्यक्ती हे संभाव्य दहशतवादी हल्ल्याचे लक्ष्य ठरू शकतात. हे हल्ले ड्रोन, रिमोट कंट्रोल उपकरणे, मायको-लाईट, एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर आदी हवाई उपकरणांच्या साहाय्याने होऊ शकतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक जीवन धोक्यात येऊ शकते.
पोलिसांचा कडक निर्णय – पुढील ३० दिवसांसाठी बंदी
या पार्श्वभूमीवर पुणे शहराचे पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये कारवाई करत पुढील आदेश दिला आहे:
दिनांक १४ मे २०२५ ते १२ जून २०२५ या कालावधीत ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायको-लाईट, एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरामोटर, हॅन्डग्लायडर, हॉट एअर बलून यांसारख्या हवाई उपकरणांच्या उड्डाणावर संपूर्ण बंदी राहील.
या बंदी आदेशाची अंमलबजावणी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात करण्यात येणार असून, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, पुणे शहर यांच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे हवाई उपकरण उडवणे हा कायद्याचा भंग मानला जाईल.
कायदा उल्लंघन केल्यास कठोर कारवाई
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत दंडनीय कारवाई होईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
पोलिसांकडून नागरिकांना आवाहन
पुणे पोलिसांनी नागरिकांना सजग राहण्याचे व कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.