Pune : डी. वाय. पाटील कॉलेजजवळ विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला; सात आरोपींना अटक

0
jpeg (3)

पिंपरी, २९ जुलै २०२५: पिंपरीतील डी. वाय. पाटील सिनियर कॉलेजजवळ सोमवारी (दि. २८ जुलै २०२५) सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास एका विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कॉलेजच्या ‘फ्रेशर पार्टी’वरून झालेल्या वादातून हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे.


 

घटनेचा तपशील

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तन्मय अविनाश कांबळे (वय १८, रा. काळे बिल्डिंग, विनायक रेसिडेन्सीसमोर, केशवनगर, कासारवाडी, पुणे) याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी तन्मय आणि त्याचा मित्र अनिश पिंगळे नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये गेले असता, तिथे उपस्थित असलेल्या अभिषेक गिरी आणि अल्फान निसार पठाण यांनी अनिश पिंगळेसोबत कॉलेजच्या ‘फ्रेशर पार्टी’ला जाण्यावरून वाद घातला आणि त्याला शिवीगाळ केली.

सकाळी ११:३० वाजता कॉलेज संपल्यानंतर, डी. वाय. पाटील सिनियर कॉलेजच्या गेटवर आरोपींनी त्यांचे ओळखीचे यश दीपक पवार, आदिनाथ सोमनाथ गायकवाड, सोहेल मुनीर शेख, शिवराज तलवारे, बिराज विश्वकर्मा आणि इतर काही मुलांना बोलावून घेतले.

यापैकी ‘निहाल’ (पूर्ण नाव माहीत नाही) याने फिर्यादीच्या अंगावर त्याच्या ताब्यातील काळ्या रंगाची अॅक्टिव्हा मोटारसायकल घातली. त्यानंतर सोहेल मुनीर शेख याने फिर्यादीला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या हातात असलेला लोखंडी कोयता फिर्यादीच्या डोक्यात आणि डाव्या हाताला मारून त्याला गंभीर जखमी केले. तसेच, फिर्यादीच्या जुन्या घराशेजारी राहणारा शिवराज तलवारे यानेही त्याच्या ताब्यातील मोटारसायकल फिर्यादीच्या अंगावर घातली. त्यानंतर जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याने हातात असलेला लोखंडी कोयता फिर्यादीच्या पाठीवर मारून त्याला गंभीर जखमी केले.

हल्ला केल्यानंतर आरोपींनी “आम्ही डी. वाय. पाटीलचे भाई आहे” असे मोठ्याने ओरडत त्यांच्या हातातील कोयते हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण केली आणि तेथून पसार झाले.


 

पोलिसांची कारवाई

 

या प्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २६७/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ३५२, १३१, १८९(२), १८९(४), १९०, १९१(३), ३(५), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट कलम ३, ७, भारतीय हत्यार कायदा कलम ४(२७) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींपैकी अभिषेक गिरी, अल्फान निसार पठाण, शिवराज तलवारे, सोहेल शेख, यश दीपक पवार, आदिनाथ सोमनाथ गायकवाड आणि एक विधीसंघर्षित बालक अशा एकूण सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आटवे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *