Bhaji Mandi Chowk: भाजी मंडई चौकात भरधाव टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू !
चिखली, दि. २३ (प्रतिनिधी) – कृष्णानगर भाजी मंडई चौकात भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर टेम्पोचालक घटनास्थळावरून पळून गेला असून, पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.Bhaji Mandi Chowk
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास आदित्य बालाजी शिंदे (वय १९) आणि त्याचे चुलते दीपक आप्पाराव शिंदे (वय २८) हे दोघे त्यांच्या ॲक्सेस स्कुटीवरून (क्र. एम.एच. १४/जी.झेड.६८३३) कृष्णानगरकडून साने चौकातील घराकडे जात होते.
त्यावेळी संविधान चौकाकडून भोसरीकडे भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात टेम्पोने (मॉडेल व नंबर माहीत नाही) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात आदित्य आणि दीपक दोघेही गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान दीपक शिंदे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघातानंतर टेम्पोचालक कोणतीही मदत न करता किंवा पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पळून गेला. आदित्य शिंदे यांनी चिखली पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (ब), १०६, तसेच मोटार वाहन कायद्याच्या १८४, १३४ (अ), (ब), ११९/१७७ कलमांनुसार अज्ञात टेम्पोचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पसार झालेल्या आरोपीचा शोध घेत आहेत.