सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५ हजार रुपये अर्थसहाय्य
Pune : मा. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी दि. ०५ जुलै, २०२४ रोजी सन २०२४-२५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणात, कापूस व सोयाबीन पिकांच्या राज्याच्या शेती उत्पन्नात मोठ्या वाटाचा उल्लेख करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याची घोषणा केली. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किंमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. या पार्श्वभूमीवर, खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे.
या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु. १००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी रु. ५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास मा. मंत्रिमंडळाच्या दि. ११ जुलै, २०२४ च्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
शासनाने यासाठी पुढील निर्णय घेतला आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हे अर्थसहाय्य मिळविण्यासाठी अर्ज प्रक्रियेचे मार्गदर्शन दिले जाईल आणि सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना त्यांचे आर्थिक सहाय्य तत्परतेने उपलब्ध करून देण्यात येईल.
हा निर्णय शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी आणि शेतीतील उत्पन्न वाढविण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी या निर्णयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मा. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी केले आहे