पुणे महानगरपालिकेच्या नाट्यगृहातल्या विद्युत कामांमध्ये घोळ; रिक्षा, सलून व्यावसायिकांना कामगार म्हणून दाखवून ठेकेदारांनी बिलं लाटली!
पुणे: पुणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक नाट्यगृहांमध्ये लाईट, साऊंड, आणि एसीची कामं बघण्यासाठी विद्युत विभागाच्या वतीने ठेकेदारांच्या मार्फत कामगार नेमले जातात. मात्र, २०१८ ते २०२३ या कालावधीत या कामांमध्ये मोठा घोळ असल्याचे समोर आले आहे. हेअर सलून व्यावसायिक, रिक्षा चालक, पेपर विक्रेते, फॅब्रिकेशन व्यावसायिक आणि इतर अनेकांचे नावं कामगार म्हणून दाखवून ठेकेदारांनी अनधिकृतरीत्या बिलं लाटली आहेत.
या प्रकरणात, नाट्यगृहांच्या व्यवस्थापनात मुळातच कुठलाही अनुभव नसलेल्या व्यक्तींना कामगार म्हणून दाखवण्यात आले आहे. एवढंच नव्हे, तर एका व्यक्तीला एकाच वेळी वेगवेगळ्या नाट्यगृहांमध्ये कामगार म्हणून दाखवले गेले आहे, ज्यामुळे या प्रकरणात गंभीर संशय निर्माण झाला आहे.
तुटपुंज्या पगारावर कामगारांना काम करवून घेणे, नाट्यगृहातील कामांसाठी संबंधित असणाऱ्या कामगारांची योग्य तपासणी न करणे, आणि ठेकेदारांना मनमानी करू देणे, या सर्व गोष्टी पुणे मनपाच्या विद्युत विभागाच्या काही वरिष्ठ अधिकारी अभियंत्यांच्या संगनमताने झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी पुणे मनपाचे आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडे संबंधित ठेकेदार आणि अधिकारी अभियंत्यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे.
– रुपेश राम केसेकर, पुणेकर नागरिक