सावधान! ईव्हीएम छेडछाड खोट्या दाव्याचा व्हिडिओ शेअर करणाऱ्यांवर एफआयआर
सावधान! ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याच्या खोट्या दाव्याचा व्हिडिओ शेअर करणाऱ्यांवर कारवाई
Maharashtra Election 2024: महाराष्ट्राच्या निवडणूक प्रक्रियेवर संशय निर्माण करणाऱ्या एका व्हिडिओमुळे राज्यात खळबळ माजली आहे. ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा दावा करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फिरत आहे. या प्रकरणी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेत संबंधित व्हिडिओच्या निर्मिती व प्रसारामागील व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
खोट्या माहितीचा फासाविरोधात कडक पाऊल
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओमध्ये सादर करण्यात आलेल्या दाव्यांचा आणि प्रतिमांचा कोणताही संबंध महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेशी नाही. अशा खोट्या दाव्यांमुळे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होतो आणि निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास कमी होण्याची शक्यता असते.
सोशल मीडियावर देखरेख वाढवली
सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या पोस्ट्सवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष पथक तैनात केले आहे. अशा पोस्ट्स शेअर करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
जनतेला आवाहन
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जनतेला विनंती केली आहे की, कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता तपासा. खोट्या माहितीचा प्रसार केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.