Maharashtra Elections: मतदानाची शाई लगेच पुसली जातेय? निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; बोगस मतदानाची भीती!

Maharashtra Elections: लोकशाहीच्या उत्सवात मतदानानंतर बोटावर लावण्यात येणारी शाई ही मतदाराची ओळख आणि अभिमान असते. मात्र, सध्याच्या निवडणुकीत ही शाई लावल्यानंतर लगेचच पुसली जात असल्याचा धक्कादायक प्रकार अनेक ठिकाणी समोर आला आहे. या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, हा प्रकार बोगस मतदानासाठी तर केला जात नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

शाहीचा दर्जा की मोठा भ्रष्टाचार?
आजवरच्या निवडणुकांमध्ये मतदानाची शाई एकदा बोटाला लागली की ती अनेक दिवस तशीच राहत असे. मात्र, यावेळी लावण्यात आलेली शाई साबण किंवा साध्या कापडानेही पुसली जात असल्याचे नागरिक सांगत आहेत. हा केवळ शाईच्या दर्जाचा प्रश्न आहे की यामागे काही मोठा भ्रष्टाचार दडला आहे? अशा प्रकारची शाई पुरवून निवडणूक आयोग दुबार मतदानाला हातभार लावत आहे का, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

बोगस मतदानासाठी महाशक्तीचा दबाव?
राजकीय वर्तुळातून अशीही टीका केली जात आहे की, एखाद्या ‘महाशक्ती’च्या दबावातून तर अशा प्रकारची निकृष्ट शाई वापरण्यात आली नाही ना? जर शाई सहज पुसली जात असेल, तर एखादी व्यक्ती पुन्हा पुन्हा मतदान करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे निवडणुकीच्या निकालावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

मतदार यादीतील ‘डबल स्टार’चा गोंधळ
केवळ शाईच नव्हे, तर मतदार यादीतील त्रुटींवरही आता बोट ठेवले जात आहे. अनेक ठिकाणी एकाच मतदाराचे नाव दोन ठिकाणी असतानाही तिथं ‘डबल स्टार’ दिसत नाहीये. याचा अर्थ असा की, ती व्यक्ती दोन ठिकाणी मतदान करूनही पकडली जाणार नाही. निवडणूक आयोगाने या तांत्रिक बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे की ही चूक आहे, याचा खुलासा होणे आवश्यक आहे.

निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरणाची मागणी
या सर्व प्रकारानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट असून @ECISVEEP ला टॅग करून प्रश्न विचारले जात आहेत. बोगस मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीची फसवणूक होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाने तात्काळ यावर स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. शाईचा हा घोळ लोकशाहीसाठी घातक ठरू शकतो.

Leave a Comment