
सुट्यांमुळे मुंबई – पुणे मार्गावर वाहतूक कोंडी, खंडाळा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा

पुणे,दि.24 डिसेंबर 2023: ख्रिसमस व नवीन वर्षानिमित्त शाळांना सुट्टी असल्याने पुणे व मुंबईकर सध्या मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. पर्यटकांचा जास्तीत जास्त कल लोणावळाला आहे. त्यामुळे लोणावळा – खंडाळा घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
ख्रिसमस व नवीन वर्षाचे स्वागत सगळे जण अगदी उत्साहात करतात. या निमित्त बरेच जण वेगवेगळ्या पर्यटन स्थळी जाणं पसंत करतात. या वर्षी पर्यटकांचा कल लोणावळाला जास्त आहे. पर्यटकांच्या स्वागतासाठी ख्रिसमस निमित्त तिथे वेगवेगळी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सलग आलेला वीकेंड व ख्रिसमस यामुळे फिरायला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आज पुणे मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. त्यातही खंडाळा घाट चढणीचा असल्यामुळे वाहने संथ गतीने पुढे सरकत आहेत.
नाताळनिमित्त सरकारी कार्यालये, महाविद्यालये तसेच शाळांना सुट्टी असल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने घराबाहेर निघाले आहेत .पर्यटकांच्या गर्दीमुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवर झालेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उद्या दुपारपर्यंत जड वाहनांना महामार्गावर बंदी असेल तसेच पर्यटकांना प्रवासात अडचण होऊ नये यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत.