
Pune : बेरोजगारीमुळे अडकलेली लग्नाची गाठ: तरुणांचे भविष्य धोक्यात !

शिक्षण आणि नोकरीतील तफावत
आज अनेक तरुण इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करतात, परंतु त्यांना योग्य नोकरी मिळत नाही. विशेषतः मुलींचे प्रमाण अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये वाढले आहे, तरीही कंपन्यांमध्ये त्यांना संधी मिळत नाही. कंपन्यांना कुशल कामगारांची गरज असते, जी बहुतेकदा आयटीआय (ITI) प्रशिक्षित तरुणांकडून पूर्ण होते. यामुळे एक विरोधाभास निर्माण झाला आहे – आयटीआय शिक्षण घेतलेला मुलगा नोकरी करतो, तर इंजिनिअर मुलीला नोकरी मिळत नाही. समाज आणि तरुण-तरुणी दोघेही हा विरोधाभास स्वीकारण्यास तयार नाहीत, परिणामी विवाह होत नाहीत.
शेतीकडे वळणारे तरुण आणि त्यांचे संघर्ष
उच्च शिक्षण घेऊनही नोकरी न मिळाल्याने अनेक तरुण शेतीकडे वळत आहेत. परंतु भारतातील शेती ही पावसावर अवलंबून असलेली जोखीम आहे. पीक चांगले आले तरी बाजारभाव मिळत नाही, त्यामुळे या तरुणांना एकरी १ लाख रुपये वार्षिक उत्पन्नही मिळत नाही. हे उत्पन्न नोकरी करणाऱ्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. परिणामी, अशा तरुणांनाही मुली मिळत नाहीत आणि मुलीही शेतकऱ्याशी लग्न करण्यास तयार होत नाहीत.
नैराश्य आणि व्यसनाधीनतेचा धोका
वय वाढत आहे, लग्न होत नाही, चांगली नोकरी मिळत नाही – या विचारांनी अनेक तरुण नैराश्यात बुडाले आहेत. काही शिकलेले तरुण तर व्यसनांच्या आहारी गेले आहेत. ही सामाजिक परिस्थिती खूपच भयानक बनत चालली आहे. तरुणांचे भविष्य अंधकारमय दिसत असून, त्यांना या संकटातून बाहेर पडण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना सर्वजण करत आहेत.