पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे, खडकवासला धरण १०० टक्के म्हणजे पूर्ण भरले आहे. धरण पुर्ण भरल्याने मंगळवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास धरणातून १ हजार ७१२ क्युसेक्स पाण्याचा मुठा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला होता. मात्र, आता या विसर्गामध्ये वाढ करण्यात आली आहे.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यात १ हजार ७१२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र आता त्यात वाढ करण्यात आली आहे. सध्या २ हजार ५६८ क्युसेक पाण्याचा विसर्ग मुठा नदीपात्रात करण्यात येत असल्याची माहिती खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्पाच्या उप विभागीय अभियंत्यांनी दिली.
पावसामुळे खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात विसर्ग वाढत आहे. त्यामुळे, नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, नदीत उतरू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.