शिक्षणशास्त्र पदवीधर बेरोजगार तरुणांच्या नियुक्तीचा खासदार सुळे यांनी सुचवला पर्याय
पुणे जिल्ह्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची मोठी कमतरता आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून शिक्षणशास्त्र पदवीधर बेरोजगार तरुणांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
खासदार सुळे यांनी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांची भेट घेतली आणि याबाबत निवेदन दिले. त्यांनी सांगितले की, पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकूण ७९४ पदे रिक्त आहेत. यामुळे ग्रामीण भागातील १२२ शाळांमध्ये शिक्षकच नाहीत.
खासदार सुळे यांनी सांगितले की, शासनाने जी गावे महानगर पालिकेमध्ये जात आहेत, त्या शाळेतील शिक्षक अतिरिक्त ठरत असल्यास जिल्ह्यातील शिक्षकांचे सेवाजेष्ठ्तेनुसार हस्तांतरण करण्यात येणार आहे. मात्र, पुणे जिल्हा परिषद अंतर्गत संबंधित शिक्षक हे जिल्ह्यात अतिरिक्त होत नसल्याने त्यांचे हस्तांतरण महानगरपालिका / नगरपालिकांकडे करता येणार नाही.
हे वाचा – दहीहंडी उत्सव निमित्त : पुण्यात वाहतूक व्यवस्थेत बदल !
याशिवाय, ऑनलाईन बदल्या झालेल्या आहेत. त्यापैकी फक्त ३३ शिक्षक बदलीच्या ठिकाणी रुजू झाले असून तब्बल २४१ शिक्षकांनी बदलीला आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
या सर्व परिस्थितीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकच नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून सासत्याने येत आहेत. यावर उपाय म्हणून शिक्षणशास्त्र पदवीधर बेरोजगार तरुणांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी खासदार सुळे यांनी केली आहे.