पुणे, दि. 17 नोव्हेंबर 2023 – पुण्यातील धनकवडी (Dhankawadi) भागात शुक्रवारी दुपारी भरधाव कारने सात ते आठ वाहनांना धडक दिली. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.(dhankawadi news today)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव पठार परिसरातील एक अल्पवयीन मुलगा आपल्या मित्राबरोबर आय ट्वेंटी कारमधून राऊंड मारत होता. त्यावेळी त्याने धनकवडी येथील सावरकर चौकात एका रिक्षाला धडक दिली. अपघात झाल्यामुळे चौकातील नागरिक मागे लागले. घाबरून गेलेल्या अल्पवयीन मुलाने गाडी भरधाव वेगाने पळवली. त्यात रस्त्यात सात ते आठ वाहनांना धडक दिली.
शेवटी सातारा रस्ता, बालाजीनगर परिसरात नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. अल्पवयीन मुलाने भावाला न सांगता मित्रालासोबत घेऊन गाडी रस्त्यावर आणली होती.
वाहनांना धडक दिल्यानंतर स्थानिक तरुणांनी त्याचा पाठलाग करून त्याला गाठत चोप दिला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.