कर्जत-जामखेडसह नगर जिल्ह्यातील बहुतांश भागात यंदा कमी पाऊस झाला आहे. जून महिन्यांत जेमतेम पाऊस झाला. जुलैनंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा मोठा खंड होता. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या कालावधीत केवळ दोन-तीन दिवस पाऊस पडला आणि नंतर गायब झाला. आतापासूनच अनेक ठिकाणी शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ऑक्टोबर महिन्यातच विहिरी आटायला लागल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा, चाऱ्याचा प्रश्नही गंभीर आहे.
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासह बहुतांशी भागात हीच परिस्थिती आहे, परंतु राज्य सरकारने केवळ ठराविक ४० तालुक्यांतच दुष्काळ जाहीर केला आहे. नगर, परभणी, नांदेड, अमरावती, वाशिम, अकोला हे जिल्हे तर वगळलेच आहेत. शिवाय जळगाव, लातूर, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांतून केवळ एकाच तालुक्याचा समावेश केलाय.
कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला दुष्काळ जाहीर करण्याची विनंती केली आहे. त्यांनी सांगितले की, अनेक जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दोन-तीन दिवसांत तुरळक पाऊस पडला असला तरी दोन महिने मात्र खंड होता. याबद्दल शासनाने गांभीर्याने विचार केलेला दिसत नाही. तांत्रिक निकषात काही अडचणी येत असल्या तरी आपल्याला केवळ तांत्रिक विचार करून चालणार नाही तर वस्तुस्थितीही समजून घ्यावी लागेल. म्हणूनच कर्जत-जामखेडसह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.
सरकारने रोहित पवार यांच्या विनंतीचा विचार करून संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.