पीएमपीएमएल बदली कामगारांना कायम करण्याचा आदेश जारी
पिंपरी:- पीएमपीएमएल (पुणे महानगर परिवहन महामंडळ) मध्ये अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या बदली कामगारांना अखेर कायम करण्याचा निर्णय झाला आहे. कामगार नेते सुनिल नलावडे यांच्या नेतृत्वाखालील उपोषण आणि आंदोलनांनंतर हा निर्णय घेण्यात आला. २६ ऑगस्ट रोजी पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे सर्किट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत २४० दिवस सेवा पूर्ण केलेल्या सर्व बदली कामगारांना कायम करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता.
आज, १ ऑक्टोबरपासून पीएमपीएमएलमध्ये १६९१ कामगारांना कायमस्वरूपी सामावून घेण्याचा आदेश पीएमपीएमएलच्या अध्यक्षा दिपा मुधोळ यांनी काढला आहे. या निर्णयासाठी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष शिंदे यांनी सातत्याने पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
या निर्णयप्रक्रियेतील महत्त्वाच्या बैठकीला पीएमपीएमएल अध्यक्षा सौ. दिपा मुधोळ-मुंढे, पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय लोखंडे, नाना काटे, प्रशांत शितोळे, कामगार प्रतिनिधी रविंद्र लांडगे, दीपक गायकवाड ,कैलास पासलकर, दत्तात्रय कोतवाल,नाना इंगुळकर ,प्रफ्फुल शिंदे,अविनाश घोगरे,अमोल घोजगे,आनंद महागंडे,अमित शितोळे इतर मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रवादी कामगार युनियनचे कार्याध्यक्ष संतोष शिंदे म्हणाले, “अजितदादांकडे कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो. या बैठकीत कामगार हिताचे निर्णय घेण्यात आले. आज बदली कामगारांना कायम करण्यात आल्याचा आदेश मिळाला आहे, तसेच वेतन आयोगाच्या फरकाचा प्रश्न देखील अंतिम टप्प्यात आहे. आम्ही पालकमंत्री आणि संचालक मंडळाचे आभारी आहोत.”
PMपीएमएल कामगारांना हा निर्णय मोठा दिलासा ठरणार आहे, ज्यामुळे त्यांच्या भविष्याची सुरक्षा वाढणार आहे.