चिंचवडमध्ये बनावट सोन्याचा मुलामा देऊन ज्वेलर्सची लाखोंची फसवणूक; धूर्त आरोपीला अटक

चिंचवडमध्ये बनावट सोन्याचा मुलामा देऊन ज्वेलर्सची लाखोंची फसवणूक; धूर्त आरोपीला अटक
पुणे: चिंचवड येथे सोन्याच्या दुकानात बनावट सोन्याचे कडे गहाण ठेवून एका ज्वेलर्सची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली आहे.
ही घटना दि. १२/०७/२०२५ रोजी चिंचवड येथील न्यू सोनिगरा ज्वेलर्स या दुकानात घडली. फिर्यादी अरविंद पनराज सोनिगरा (वय ५१) यांच्याकडे एक अज्ञात व्यक्ती सोनेरी रंगाचे कडे घेऊन आला. त्याने ते कडे सोन्याचे असल्याचे भासवून गहाण ठेवले आणि त्याबदल्यात १,३०,०००/- रुपये घेतले.
नंतर तपासणी केली असता, ते कडे सोन्याचे नसून, चांदीच्या कड्यास सोन्याचा मुलामा दिलेला असल्याचे समोर आले. अशा प्रकारे आरोपीने फिर्यादीची फसवणूक केली.
या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तांत्रिक तपास आणि माहितीच्या आधारे आरोपी अमोल सुभाष बलदोटा (वय ३३) याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक दुधे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
अशा फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी ज्वेलर्सने कोणत्याही मौल्यवान वस्तूची तपासणी करूनच व्यवहार करणे आवश्यक आहे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.