भोसरीमध्ये भरदिवसा गणपती स्टॉलजवळ लुटमार; नागरिकांच्या मदतीने दोन आरोपींना पकडले

भोसरीमध्ये भरदिवसा गणपती स्टॉलजवळ लुटमार; नागरिकांच्या मदतीने दोन आरोपींना पकडले, १५ हजार रुपये वाचले
पिंपरी-चिंचवड: भोसरीमध्ये भरदिवसा एका गणपती मूर्ती विक्रेत्याला लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, विक्रेत्याने आरडाओरडा केल्याने आणि नागरिकांनी तात्काळ धाव घेतल्याने दोन आरोपींना जागेवरच पकडण्यात यश आले.
ही घटना दि. २७/०८/२०२५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास भोसरी ब्रिजखालील पीएमटी बस स्टॉपजवळील गणपती स्टॉलवर घडली. फिर्यादी गौरव दत्तात्रय नलावडे (वय २७) हे आपल्या स्टॉलवर असताना, आरोपी सुमित बनोस राठोड याने त्यांच्या पॅन्टच्या खिशातून १५ हजार रुपये रोख जबरदस्तीने काढून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
गौरव यांनी तातडीने ‘चोर-चोर’ असा आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतली आणि त्यांनी सुमित राठोड आणि त्याचा साथीदार बीपीएल सोलंकी गुजर या दोघांनाही पकडले. या गुन्ह्यात आणखी दोन जण सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक मांजरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि धाडसामुळे हा गुन्हा यशस्वी होण्यापासून रोखला गेला आहे.