पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवडमध्ये एका प्रसिद्ध वडापावच्या हॉटेलच्या नावाचा ट्रेडमार्क बदलून त्याची नक्कल केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘एसएसव्ही श्री सिद्धिविनायक वडापाव’ या नावाची हुबेहुब नक्कल करून ‘एसएसटी श्री सिद्धिविनायक वडापाव’ या नावाने हॉटेल सुरू ठेवल्याचा आरोप या आरोपींवर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर सोमेश्वर लाड (वय ३९, रा. मोशी) यांनी पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी लाड यांचा ‘एसएसव्ही श्री सिद्धिविनायक वडापाव’ या नावाने व्यवसाय आहे आणि या नावाला कायदेशीररित्या ट्रेडमार्क रजिस्टर करण्यात आले आहे.
आरोपी अखिल निजामुद्दीन अन्सारी (वय ३६) आणि सलीम निजामुद्दीन अन्सारी (वय ४५, दोघे रा. मोशी) यांनी मार्च २०२४ पासून सेक्टर १४६, जी ब्लॉक, शास्त्रीनगर, पिंपरी येथे ‘एसएसटी श्री सिद्धिविनायक वडापाव’ या नावाने हॉटेल सुरू केले. आरोपींनी फिर्यादीच्या ट्रेडमार्क नावात केवळ एका अक्षराचा बदल करून हुबेहुब नक्कल केली. यामुळे ग्राहक आणि फिर्यादीची फसवणूक झाली असून, आरोपींनी त्याचा आर्थिक फायदा घेतला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१६, ३१८, ३(५) आणि ट्रेडमार्क कायदा कलम १०३, १०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.