पुणे: शहरात अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. वाघोली येथे भरधाव वेगात आलेल्या एका डंपरने मोपेडला धडक दिल्याने, एका ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
काय घडले नेमके? ही हृदयद्रावक घटना २८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास, वाघेश्वर मंदिर चौक, वाघोली, पुणे येथे घडली. एका अज्ञात डंपरचालकाने आपल्या ताब्यातील हायवा डंपर वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून, अत्यंत हयगयीने, अविचाराने आणि भरधाव वेगात चालवला.
या भरधाव डंपरने मोपेडवरून जाणाऱ्या भारती प्रकाश देठे (वय ४५, रा. आळंदी रोड, विश्रांतवाडी, पुणे) यांना जबर धडक दिली. डंपरच्या धडकेमुळे भारती देठे गंभीर जखमी झाल्या आणि दुर्दैवाने त्यांचा जागीच मृत्यू झाला. डंपरचालकाने मात्र घटनास्थळावरून पळ काढला.
गुन्हा दाखल, डंपरचालकाचा शोध सुरू या प्रकरणी वाघोली पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात डंपरचालकाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६ (१), १२५ (ब) आणि मोटर वाहन अधिनियम कलम १८४, १३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा, कॉप्स २४, वाघोली पोलीस स्टेशनमध्ये नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदार दत्तात्रय गोरे यांनी फिर्याद दिली आहे.