Alandi Amrut अनुभव Pat Sanstha Fraud: आळंदीत ११ कोटींचा अपहार; पतसंस्थेच्या मॅनेजरसह तिघांवर गुन्हा दाखल

पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील अमृतानुभव नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल ११ कोटी ३ लाख १३ हजार ३८० रुपयांचा अवाढव्य अपहार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पतसंस्थेच्या व्यवस्थापकासह तिघांविरुद्ध आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

बनावट सोने तारण आणि कागदपत्रांचा आधार
या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि पतसंस्थेचे व्यवस्थापक बाळु अर्जुन पवार यांनी पदाचा गैरवापर करत इतर आरोपींशी संगणमत केले. बनावट कर्जदार उभे करून आणि बनावट कागदपत्रे तयार करून सोने तारण कर्ज मंजूर केल्याचे भासवण्यात आले. प्रत्यक्षात ही कर्जाची रक्कम आरोपींनी संगणमत करून स्वतःच्या फायद्यासाठी काढून घेतली आणि पतसंस्थेची मोठी फसवणूक केली.

सोनार आणि ऑडिटर्सची भूमिका संशयास्पद
पतसंस्थेने नियुक्त केलेले सोनार आणि ऑडीटर यांनी देखील या प्रकरणात सभासद व संचालक मंडळाचा विश्वासघात केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. बनावट सोन्याच्या आधारावर खोटे अहवाल देऊन हा कोट्यवधींचा घोटाळा लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. फिर्यादी संजय जयसिंग शिर्के यांनी या विरोधात सविस्तर तक्रार दिली असून, पोलिसांनी भा.न्या.स कलम ३१६ (२), ३१६ (५), ३१८(४), ३३६ (३), ३३८, ३४०(२), ३(५) नुसार गुन्हा नोंदवला आहे.

आरोपींची नावे आणि पोलीस तपास
या गुन्ह्यात १) बाळु अर्जुन पवार (रा. चहोली खुर्द), २) संजय मोहन लांडगे (रा. हडपसर) आणि ३) पुर्णानंद अरविंद खोलम (रा. चहोली बुद्रुक) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. आळंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सहकारी संस्थांमधील वाढते घोटाळे सामान्य गुंतवणूकदारांची झोप उडवणारे आहेत. अमृतानुभव पतसंस्थेतील हा ११ कोटींचा घोटाळा सहकार विभागाच्या तपासणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. लवकरच आरोपींना अटक करून ठेवीदारांचे पैसे परत मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment