पुणे शहर

Pune :पुण्यात बापू नायर टोळीवर खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई !

पुणे: खंडणी विरोधी पथक २, गुन्हे शाखा पुणे शहराने(Pune City Live ) व्यवसायिकास बेकायदेशीर पैशाची मागणी करणाऱ्या बापू नायर गुन्हेगार टोळीतील सराईत गुन्हेगार व त्याचे साथीदारांवर तडाखेबाज कारवाई केली आहे. तक्रारदार हे एक प्रतिष्ठित इलेक्ट्रीक व्यवसायिक असून त्यांच्या प्लॉट खरेदी-विक्रीच्या व्यवसायामध्ये देखील ते सक्रीय आहेत. तक्रारदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार तबरेज सुतार यांनी बेकायदेशीर पैशांच्या मागणीसाठी धमकावत असल्याची तक्रार खंडणी विरोधी पथकास प्राप्त झाली होती.

तक्रारीच्या अनुषंगाने, तबरेज मेहबुब सुतार (रा. कात्रज पुणे) हा त्याचे साथीदारांसह तक्रारदारांना त्यांच्या व्यवसायात मोठा आर्थिक फायदा झाल्याचे सांगून भविष्यात व्यवसाय सुरळीत सुरू ठेवण्यासाठी खंडणी स्वरूपात जीवे ठार मारण्याची धमकी देत होता. तबरेजने तक्रारदारांकडून १० लाख रुपये घेतले असून आणखी ३० लाख रुपयांची मागणी केली होती. त्या अनुषंगाने आरोपी नामे १) तबरेज मेहबुब सुतार, २) अविनाश नामदेव मोरे, ३) सागर किसन धुमाळ, ४) कुमार ऊर्फ पप्पु सायकर यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि नं. ४०३/२०२४ भादविक ३८६, ३८७, ५०४, ५०६(२), ५०७, ३४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

सदर गुन्ह्यातील निष्पन्न आरोपींना शोध घेत असताना खंडणी विरोधी पथक-२ ने आरोपी अविनाश नामदेव मोरे व सागर किसन धुमाळ यांना ताब्यात घेतले आहे. ते सध्या पोलीस कस्टडीत आहेत. तबरेज मेहबुब सुतार हा बापू नायर टोळीतील सक्रिय सदस्य असून मार्च २०२२ पासून तो जेलमध्ये आहे. तबरेजवर खुन, खुनाचा प्रयत्न असे एकूण ७ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सर्व व्यापारी आणि व्यावसायिक प्रतिनिधींना अनिकृत माथाडी व खंडणी संदर्भात बेकायदेशीर पैशाची मागणी अथवा अडवणूक होत असल्यास तत्काळ संपर्क करण्याचे आवाहन पुणे शहर पोलीस दलामार्फत करण्यात येत आहे.

या यशस्वी कारवाईसाठी पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त श्री. प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-२) श्री. सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक २, गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक श्री. प्रताप मानकर, पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, दिलीप गोरे, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, पवन भोसले, चेतन शिरोळकर, अमोल राऊत, प्रशांत शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Editorial Team

Pune City Live या वेबसाईटचे आपल्या वेबसाईटसाठी विविध क्षेत्रांतील बातम्या आणि लेख लिहितात. त्यांच्या लेखणीतून पुण्यातील विविध घडामोडी, घडामोडींची विश्लेषणे, तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *