पुणे, ०१ जुलै २०२५: उत्तमनगर पोलीस स्टेशन (Uttamnagar Police Station) हद्दीत एका ७६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात मोबाईल धारकाने शेअर ट्रेडिंगमध्ये (Share Trading) जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगून तब्बल १३ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक (Financial Fraud) केली. ही घटना १५ एप्रिल ते २७ मे २०२५ दरम्यान घडली.
फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना एका अज्ञात मोबाईल धारकाने संपर्क साधला आणि शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे प्रलोभन दिले. यानंतर, आरोपीने वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले. फिर्यादीने त्याच्यावर विश्वास ठेवून एकूण १३ लाख १५ हजार रुपये गुंतवले. मात्र, त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही आणि आरोपीने संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारक आणि बँक खातेधारकांविरुद्ध भा.न्या.सं.क. ३१९ (२), ३१८ (४) आणि आयटी ॲक्ट कलम ६६ डी अंतर्गत गुन्हा (गु.र.नं. ८३/२०२५) दाखल करण्यात आला आहे. पोलीस सायबर माध्यमातून आरोपींचा शोध घेत असून, नागरिकांनी अशा कोणत्याही आमिषांना बळी पडू नये, तसेच अनोळखी व्यक्तींबरोबर आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुणे शहर आणि परिसरातील सायबर क्राईमच्या (Cyber Crime) वाढत्या घटना लक्षात घेता, नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.