Pune : २९ मार्च २०२५: कदमवाकवस्ती येथील एका शाळेतील(Pune News Marathi ) शिक्षिकेचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात, लोणी काळभोर पोलिसांनी केवळ २४ तासांच्या आत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करून त्वरित कारवाईचा आदर्श उभा केला आहे.
२८ मार्च २०२५ रोजी, कदमवाकवस्ती गावातील शाळेमध्ये शिक्षिका वर्गात असताना, गणेश सुरेश अंबिके (वय ४५, रा. लोणी काळभोर, पुणे) यांनी त्यांना वर्गाबाहेर बोलावण्याचा प्रयत्न केला. शिक्षिकेने नकार दिल्यानंतर, आरोपीने जबरदस्तीने त्यांचा हात पकडून जवळ ओढले, ज्यामुळे त्यांच्या स्त्रीमनास लज्जा उत्पन्न झाली. तसेच, आरोपीने त्यांना हाताने मारहाण करून अश्लील शिवीगाळ केली. या घटनेनंतर, पीडित महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे, लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तात्काळ तपास सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के यांनी अवघ्या २४ तासांच्या आतच आरोपीविरुद्ध सबळ पुरावे संकलित करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणाचा कोर्ट केस नंबर १६३०/२०२५ असून, २९ मार्च २०२५ रोजी न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
महिला सुरक्षेसाठी आणि न्याय देण्याच्या उद्देशाने, महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांचा तपास जलदगतीने पूर्ण करून २४ तासांच्या आत आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. या आदेशांचे पालन करत, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर श्री. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग श्रीमती अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर पोलीस ठाणे श्री. राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली, तपासी अधिकारी श्री. दिगंबर सोनटक्के आणि पोलीस अंमलदार अमोल जाधव यांनी सदर गुन्ह्याचा तपास २४ तासांच्या आत पूर्ण करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या त्वरित आणि प्रभावी कारवाईमुळे, पीडित महिलेला न्याय मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. पोलिसांच्या या जलदगतीने केलेल्या कार्यवाहीचे समाजातून कौतुक होत आहे.