Pune:पर्यावरण दिनानिमित्त पुणे संवाद ग्रुपचे पहिले व्याख्यान यशस्वीरीत्या पार पडले !

0
img-20240605-wa00043132359421643315300.jpg

आज, 5 जून, पर्यावरण दिनानिमित्त इंद्रधनु हॉल, राजेंद्र नगर येथे सकाळी 9 ते 12 या वेळेत पुणे संवाद ग्रुपचे पहिले व्याख्यान पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात श्री अमित सिंग यांनी “किक-ऑफ” पद्धतीने सकाळी 9 वाजता गप्पा मारून केली. यावेळी पर्यावरणाच्या विविध अंगांवर, स्थानिक ते जागतिक स्तरावर चर्चा करण्यात आली. उपस्थित सर्वजण या चर्चेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

जागतिक तापमान बदल, पाणी टंचाई, धरणांचे प्रश्न आणि काल पुण्यात झालेला पाऊस या सर्व विषयांवर चर्चा झाली. कर्नल सुरेश पाटील यांच्या धरणविषयक व्याख्यानाची सर्वांना उत्सुकता होती. बरोबर 10 वाजता कर्नल पाटील यांचे गुलाबफूल देऊन स्वागत करण्यात आले आणि त्यांनी आपले विचार मांडण्यास सुरवात केली.

कर्नल पाटील यांनी जागतिक स्तरावर धरणे मातीगाळाने भरली असल्यामुळे त्यांच्या मूळ क्षमतेपेक्षा पाणी कमी प्रमाणात साठत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे तुलनात्मकरीत्या थोड्या पावसानेही धरणे ताबडतोब भरून ती पाणी सोडून देतात, परिणामी पुढील भागातील लोकांना पूरसदृश्य स्थितीला तोंड द्यावे लागते. त्यांनी खडकवासला धरणावरील गाळउपसा कामाचे महत्त्वही मांडले. उपसलेला गाळ शेतकऱ्यांपर्यंत पोचवून त्याचा फायदा कसा होतो हे सांगून श्रोत्यांना आनंद झाला.

धरणे गाळमुक्त करून भारताला मोठ्या अर्थव्यवस्थेचा देश बनवण्याची कर्नल पाटील यांची खात्री आहे. धरणे राखण्यासाठी कोणती नियमावली आहे का असे विचारले असता, तसे काही निश्चित नसल्याचे समोर आले. त्यामुळे अशा नियमावलीची आवश्यकता आणि प्रयत्नांची गरज व्यक्त करण्यात आली.

प्रशासन व सरकारच्या जबाबदारीबाबत नागरिकांनी प्रश्न विचारणे आणि माहिती अधिकारातून माहिती गोळा करून सरकारची अक्षमता लोकांपर्यंत पोचवणे आवश्यक असल्याची चर्चा झाली. कर्नल पाटील यांना आलेला अनुभव श्रोत्यांना आवडला आणि श्रोत्यांनी या कामात सक्रिय सहभाग दर्शवला.

संपूर्ण कार्यक्रम संवादात्मक रित्या पार पडला. कर्नल व श्रोत्यांचे आभार मानण्यात आले. उद्या, गुरुवार 6 जून रोजीच्या व्याख्यानांची माहिती देण्यात आली आणि पहिल्या दिवसाचा कार्यक्रम संपला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *