Pune Gangwar Update :पुणे शहर पुन्हा एकदा गँगवॉरच्या दहशतीने हादरले आहे! कुख्यात आंदेकर टोळी आणि कोमकर-म्हस्के गटातील शत्रुत्वाने आता रक्ताचा चौथा बळी घेतला आहे. वनराज आंदेकर हत्येचा बदला घेण्याचे सत्र थांबायचं नाव घेत नाहीये. आज भरदिवसा बालाजीनगर परिसरात अक्षय ऊर्फ बाळा म्हस्केची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण पुण्यात खळबळ उडाली आहे. बंडू आंदेकर आणि त्याचे कुटुंब जेलमध्ये असताना ही हत्या झालीच कशी? हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
भरदिवसा थरार: बालाजीनगर बस स्टॉपवर गोळीबार आणि वार
आज दुपारी धनकवडी परिसरातील बालाजीनगर बस स्टॉपवर हा थरार घडला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, काही अज्ञात हल्लेखोरांनी अक्षय ऊर्फ बाळा म्हस्के याला लक्ष्य केले. आधी त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यानंतर धारदार शस्त्राने (कोयत्याने) सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात अक्षयचा जागीच मृत्यू झाला. अक्षय म्हस्के हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आकाश म्हस्केचा सख्खा भाऊ होता.
आंदेकर-कोमकर टोळीयुद्धातील चौथी मोठी हत्या
हे टोळीयुद्ध आता अत्यंत हिंसक वळणावर पोहोचले आहे. सप्टेंबर 2024 मध्ये माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर बरोबर एक वर्षाने बदला घेण्यासाठी आयुष कोमकरची हत्या झाली. आता अक्षय म्हस्केचा गेम झाल्याने या युद्धात एकूण 4 बळी गेले आहेत. विशेष म्हणजे, आंदेकर कुटुंबातील प्रमुख सदस्य सध्या मोक्का अंतर्गत जेलमध्ये आहेत, तरीही ही साखळी तुटताना दिसत नाहीये.
बंडू आंदेकरची जेलमधून सूत्रं? चर्चेला उधाण
वनराज आंदेकरचे वडील बंडू आंदेकर सध्या कारागृहात आहेत. मात्र, पुण्याच्या गुन्हेगारी वर्तुळात अशी चर्चा आहे की, जेलमध्ये बसूनच आंदेकर टोळी सक्रिय ठेवण्यात आली आहे. आपल्या मुलाच्या आणि नातवाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बंडू आंदेकरने ही दुसरी मोठी ‘टिप’ दिल्याचे बोलले जात आहे. पोलीस आता या हत्येमागील मास्टरमाईंडचा शोध घेत आहेत.
पुणे पोलिसांसमोर मोठे आव्हान
विश्रांतवाडी, धनकवडी आणि नाना पेठ या भागांमध्ये टोळीयुद्धामुळे दहशतीचे वातावरण आहे. पोलीस आयुक्त आणि गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी दाखल झाली असून परिसरातील CCTV फुटेज तपासले जात आहेत. ‘पुणे शहर हे आता गँगवॉरचे केंद्र बनतेय का?’ असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत.
पुण्यातील हे रक्ताचं राजकारण कधी थांबणार? पोलीस या टोळीयुद्धाचा बिमोड करण्यात यशस्वी होतील का? की हे सत्रात अजून बळी जातील? तुम्हाला काय वाटतं, पुण्यात पुन्हा ‘गँगराज’ सुरू झालंय का? कमेंट्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा.

