
पौड, दि. ५ मे २०२५: मुळशी तालुक्यातील पौड गावातील नागेश्वर मंदिरात (Nageshwar temple in Mulshi )अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून, गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.या घटनेची माहिती देताना स्थानिक रहिवासी शिवाजी मारुती वाघवाले (वय ३४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १९ वर्षीय चांद नौशाद शेख या तरुणाने मंदिरात प्रवेश करून मंदिराचे दरवाजे आतून बंद करत अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला धक्का देऊन ती पाडली. या घटनेनंतर चांदचा पिता नौशाद शादाब शेख (वय ४४) यानेही उपस्थित लोकांसमोर, “तुम्ही हिंदू आमचं काहीच करू शकत नाही,” असे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे.
सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी X वर पोस्ट करत लिहिले, “पौड गावातील अन्नपूर्णा देवीच्या मंदिरात एका तरुणाने गैरकृत्य केल्याचे समोर आले आहे. ही घटना अतिशय घृणास्पद आणि संतापजनक आहे. कोणतीही संवेदनशील व्यक्ती हे कदापि सहन करणे शक्य नाही. माझी शासनाला विनंती आहे की कृपया या तरुणावर तातडीने कठोरात कठोर कारवाई करावी. सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला माफी मिळता कामा नये, अशी आमची भूमिका आहे.” त्यांनी पुणे ग्रामीण पोलिसांना (
@puneruralpolice
) टॅग करत तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
मात्र, सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये आरोपीचे नाव आणि धर्म उल्लेख न केल्याने त्यांच्यावर सोशल मीडियावर टीका होत आहे. अनेकांनी त्यांना “नाव घेण्याची हिंमत का नाही?” असा सवाल विचारला आहे. काहींनी तर या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे.
पोलिसांचा बंदोबस्त
या घटनेनंतर पौड गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागेश्वर मंदिर आणि जवळच्या मशिदीभोवती मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी चांद नौशाद शेख आणि त्याचा पिता नौशाद शादाब शेख यांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी गावातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले असले, तरी स्थानिकांमध्ये असंतोष कायम आहे.
सामाजिक तणावाची भीती
या घटनेमुळे पौड गावात सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. स्थानिकांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. काहींनी रस्त्यावर उतरून निदर्शनेही केली आहेत. या प्रकरणावरून राजकीय पक्षांमध्येही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.