pune crime news hadapsar : थंडीच्या दिवसात घराबाहेर शेकोटी पेटवून मित्रासोबत बसलेल्या एका २४ वर्षीय तरुणावर केवळ “रागाने का बघतोस?” अशी विचारणा करत टोळक्याने लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना हडपसर परिसरात घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात ९ जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे.Pune Crime News marathi
ही घटना १९ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास शिंदे वस्ती, हडपसर येथील एस.आर.ए. (SRA) बिल्डिंग परिसरात घडली.
नेमकी घटना काय? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (वय २४ वर्षे, रा. हडपसर) हे गुरुवारी रात्री आपल्या एका मित्रासोबत एस.आर.ए. बिल्डिंगच्या खाली शेकोटी पेटवून बसले होते. त्यावेळी आरोपी ओमकार राजू झोंबाडे हा तिथे आला. त्याने फिर्यादीजवळ जाऊन “तू माझ्याकडे रागाने का बघतोस?” असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला बाचाबाची आणि धक्का-बुक्की झाली. त्यानंतर ओमकारने आपले इतर साथीदार तुषार काकडे, लक्ष्मण बगाडे, दीपक शर्मा, कैलास काकडे आणि इतर ४ जणांना तिथे बोलावून घेतले. या जमावाने फिर्यादी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत.
आरोपींची नावे: याप्रकरणी वानवडी पोलिसांनी खालील आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे: १) तुषार कैलास काकडे (वय २१) २) लक्ष्मण अनिल बगाडे (वय २४) ३) दिपक काकाराम शर्मा (वय २२) ४) कैलास संजीवन काकडे (वय ४०) ५) ओमकार राजु झोंबाडे (वय १९) – (याला अटक करण्यात आली आहे) व इतर ४ अनोळखी साथीदार. (सर्व रा. एसआरए बिल्डिंग, शिंदे वस्ती, हडपसर).
पोलीस कारवाई: वानवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ११५(२), ११८(१), ३५१(२), ३५२, १८९(२), १८९(४), १९१(१), १९१(२), १९१(३), १९०, ३५२ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा आणि आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिंदे वस्ती परिसरात या घटनेमुळे काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती संगिता जाधव करत आहेत.





