इंदापूर हादरले! पत्नी व चिमुकल्या मुलावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; खोरोची येथील पतीविरुद्ध गुन्हा दाखल
इंदापूर तालुक्यातील खोरोची येथे जनावरांची साफसफाई करण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीवर कोयत्याने वार करून तिला व भांडण सोडवण्यासाठी आलेल्या १० वर्षांच्या चिमुकल्या मुलाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून बावडा पोलीस दूरक्षेत्र (इंदापूर पोलीस ठाणे) येथे पतीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सौ. अनुराधा अमर फडतरे (वय ३०, रा. खोरोची, ता. इंदापूर, जि. पुणे) यांचा विवाह २०१४ मध्ये अमर लक्ष्मण फडतरे (देशमुख) यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही काळ संसार सुरळीत चालल्यानंतर पती अमर हा लग्नातील सोन्याच्या दागिन्यांची मागणी करत वारंवार मारहाण व छळ करत होता. नातेसंबंध तुटू नयेत म्हणून विवाहिता हा छळ सहन करत होती. दरम्यान, महिनाभरापूर्वी झालेल्या वादानंतर पतीने पुन्हा मारहाण न करण्याची हमी देऊन तिला घरी आणले होते.
पहाटेच्या सुमारास कोयत्याने हल्ला:
दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ५:०० वाजेच्या सुमारास पती अमर याने पत्नीला जनावरांची साफसफाई करण्यास सांगितले. त्यावर पत्नीने “तुम्ही दिवसभर फिरत असता, तुम्हीच झाडझुड करा” असे म्हणताच संतप्त झालेल्या पतीने लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. वाद वाढल्याने पतीने घरात पडलेला कोयता हातात घेऊन पत्नीच्या डोक्यावर, पाठीवर आणि दोन्ही हातांवर सपासप वार केले. आईला वाचवण्यासाठी १० वर्षांचा मुलगा समर्थ पुढे आला असता, निर्दयी पतीने त्यालाही मारहाण केली.
या गंभीर घटनेनंतर पीडितेने तातडीने ‘डायल ११२’ वर संपर्क साधून पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचार घेतल्यानंतर विवाहितेने बावडा दूरक्षेत्रात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अमर लक्ष्मण फडतरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार करत आहेत.
