वेगवेगळ्या हॉटेल आणि लॉज वर नेवून काढले तरुणीचे निवस्त्र अवस्थेत असताना व्हिडीओज व फोटोज !

पुणे: एका तरुणीचे खासगी क्षणातील व्हिडिओ आणि फोटो तिच्या नकळत काढल्याप्रकरणी प्रांजल मनीष खेवलकर नावाच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेवलकर याला याआधी अमली पदार्थ (NDPS) प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याच्या मोबाईलच्या तपासणीत हे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत.
नेमकं काय घडलं?
खराडी पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस ॲक्टनुसार दाखल केलेल्या गुन्ह्यात प्रांजल खेवलकरला अटक करण्यात आली होती. तपासणीदरम्यान पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला. या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणामध्ये पोलिसांना काही आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो आणि ऑडिओ क्लिप्स मिळाल्या. या क्लिप्समध्ये एक तरुणी निवस्त्र अवस्थेत दिसत होती.
माहिती मिळाल्यानंतर राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली. त्यानंतर, पीडित तरुणीने १४ ऑगस्ट २०२५ रोजी सायबर पोलीस स्टेशनमध्ये स्वतः हजर राहून तक्रार दाखल केली.
खासगी क्षण कॅमेऱ्यात कैद
पीडित तरुणीने तिच्या फिर्यादीत म्हटले आहे की, २०२२ ते जून २०२५ या काळात प्रांजल खेवलकर याने वेगवेगळ्या लॉजवर तिच्या खासगी क्षणांचे व्हिडिओ, ऑडिओ आणि फोटो तिच्या परवानगीशिवाय काढले. तिचा गोपनीयतेचा आणि खासगीपणाचा भंग होईल, अशा हेतूने त्याने हे कृत्य केले. भविष्यात या सामग्रीचा गैरवापर करण्याचा त्याचा उद्देश होता, असा पोलिसांना विश्वास आहे.
सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी प्रांजल खेवलकर विरोधात सायबर पोलीस स्टेशन, पुणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ८८/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ७७ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक करत आहेत.
या घटनेमुळे तरुणांनी अशा सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याची गरज पुन्हा एकदा समोर आली आहे.